घाटमाथ्यावरील मतदार ठरणार निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:45 PM2019-04-10T23:45:14+5:302019-04-10T23:45:23+5:30
मावळमध्ये मतदारांच्या संख्येत वाढ : पनवेलकडेही प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष
अरुणकुमार मेहत्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर घाटावर आणि घाटाखाली असा परिसर आहे. घाटावरील पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात रायगडपेक्षा ७३ हजार ५०० मतदार जास्त आहेत. त्यामुळे तेथील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत घाटाखालील तीन विधानसभा मतदारसंघात मतदार वाढले आहेत.
निवडणूक आयोगाकडून २००९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी, चिंचवड व मावळ असे घाटावरील म्हणजे पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. पिंपरी व चिंचवड हा शहरी भाग आहे. सर्वात श्रीमंत महापालिकेचाही यात समावेश आहे. येथे आठ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघाचा आकडा सव्वातीन लाखांच्यावर आहे. तीनही मतदारसंघात साडेअकरा लाखांच्या पुढे मतदार आहेत. घाटाखालचा विचार केला तर कर्जतच्या विधानसभा मतदारसंघात खालापूर तालुक्याचाही समावेश आहे. कर्जत-खालापूरचे मतदार पावणेतीन लाख आहेत. उरणची विधानसभा मतदारसंघाचा आकडाही वाढला आहे. सर्वाधिक मतदार पनवेल विधानसभा मतदारसंघात आहेत. येथे मतदारांनी पाच लाखांचा आकडा ओलांडला आहे.
विधानसभेला हा आकडा सव्वापाच लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे येथे राजकीय पक्षांनी अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. येथील मतदारांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. घाटावर तीनही मतदारसंघाचे मतदार निर्णयक ठरू शकतात. हा आकडा पाऊण लाखाने जास्त आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीचा विचार केला, तर मतदारसंख्या सव्वा लाखांपेक्षा कमी होती. आता हा फरक हजारांवर आला आहे.