घोणसे घाट धोकादायक, बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:38 AM2018-07-09T03:38:03+5:302018-07-09T03:38:19+5:30

मुंबई-दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवासीवाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड अतिवृष्टीमुळे निखळण्यास सुरु वात झाली आहे. बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

 Ghonse Ghat dangerous | घोणसे घाट धोकादायक, बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

घोणसे घाट धोकादायक, बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

Next

श्रीवर्धन - मुंबई-दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवासीवाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड अतिवृष्टीमुळे निखळण्यास सुरु वात झाली आहे. बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
म्हसळा शहराचे प्रवेशद्वार असलेला घोणसे घाटात अपघातांची मालिका नेहमीच सुरू असते, यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ठाणे दिवेआगार एसटीच्या अपघातानंतर पूर्वीचा केळेवाडीचा तीव्र वळण रस्ता बदलून त्याऐवजी दुसऱ्या पर्यायी रस्त्याची निर्मिती करण्यात आली.
सध्या वापरात असलेला मुख्य रस्त्याच्या वळणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पर्यायी मार्गाची निर्मिती करताना दरड संरक्षणासाठी दगडाची भिंत रस्त्याच्या डाव्या बाजूला बांधण्यात आली होती. मात्र, त्या भिंतीचे अनेक लहान-मोठे दगड निळखत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
घोणसे घाट वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त व महत्त्वाचा आहे. श्रीवर्धन तालुक्यात प्रवेश करण्यासाठी घोणसे घाटाशिवाय पर्याय नाही. श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगार व श्रीवर्धनकडे वीकेण्डला पर्यटकांचा ओघ सदैव असतो. त्यासोबत दक्षिण काशी असलेल्या हरिहरेश्वरला भाविकांची गर्दी वाढतच आहे, त्यामुळे घोणसे घाट लाखो लोकांच्या जीवितांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
घोणसे घाटात अपघात प्रवण क्षेत्राचे नामनिर्देशन करणारे फलक क्वचित ठिकाणी निदर्शनास येतात. म्हसळ्याकडे जाताना घाटातील लोखंडाचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. घाटातील मुख्य वळणावर सभोवतालच्या डोंगरमाथ्यावरील पाणी झिरपताना दिसते. वेळीच दखल न घेतल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. संरक्षक भिंतीचे दगड बसवल्यास दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी मदत होईल. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात या आठवड्यात पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक रस्ते, घरे, महावितरणाचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.
माणगाव ते म्हसळा २७ कि.मी.चे अंतर आहे. घोणसे घाटाची लांबी अंदाजे एक कि.मी. आहे. घाटाच्या उजव्या बाजूस खोल दरी आहे. सध्या माणगाव ते दिघी या महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.
सदरचे काम चांदोरे गावाच्या हद्दीपर्यंत होत आले आहे. घोणसे घाटातील रस्त्याची झालेली वाताहत लवकर दूर व्हावी व दरड संरक्षक उपाययोजना लवकर करण्यात याव्यात, अशी मागणी चालक तसेच स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

घोणसा घाटाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. वळणावरील रस्ता खचला आहे. दरड संरक्षक भिंतीचे दगड निखळले आहेत. संबंधित बांधकाम विभागाने वेळीच लक्ष न दिल्यास, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनहितासाठी आंदोलन करण्यात येईल.
- नाझीम हसवारे,
अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी
घोणसे घाटातील वळण रस्त्यावरील खड्ड्यांनी जीव मेटाकुटीला येत आहे. घोणसे घाट तालुक्यातील सर्वात अवघड वळणाचा घाट आहे, त्यामुळे चालकांना नेहमीच सतर्क राहावे लागते. या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी घाटातील वळणे, रस्ते नवखे असल्याने अपघात वाढले आहेत.
- संदीप गुरव, चालक, एसटी महामंडळ

घोणसे घाटातील रस्ता अतिशय खराब झाला आहे, त्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. दरड कोसळल्यास सर्व वाहतूक ठप्प होईल.
- अभय कळमकर, वाहनचालक
घोणसे घाटात सर्व चालकांना सावकाश चालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घोणसे घाटातील मुख्य वळण रस्ता अतिशय खड्डेमय झाला आहे. त्याची लवकर दुरु स्ती होणे अपेक्षित आहे.
- सुधा विचारे,
वाहतूक नियंत्रक, म्हसळा
 

Web Title:  Ghonse Ghat dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.