लोकमत न्यूज नेटवर्क, उरण: एनएच-४८ या राष्ट्रीय मार्गापासून तवा जंक्शनपर्यंतच्या सुमारे ३२ किमी वाढवण बंदराशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. रस्ता झाल्यानंतर पुढील पावसाळ्यानंतर वाढवण बंदराच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात होणे अपेक्षित असल्याचे जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितले.
वाढवण बंदराच्या महत्त्वपूर्ण विकासाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, खदानीपासून नियोजित वाढवण बंदरापर्यतच्या साईटवरून बांधकामासाठी सामग्री नेण्यासाठी अवजड वाहतुकीसाठी स्थानिक रस्ते खूपच अरुंद आहेत. यासाठी रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याची आवश्यकता आहे. वाढवण मोठे बंदर उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरून येथे पोहोचण्यासाठी महामार्गाचा विस्तार करण्याचा विचार आहे.
कामाची अधिसूचना जारी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्ता जोडणीच्या कामाचा आराखडा मंजूर केल्यानंतर केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ऑफ हायवेने एनएच-४८ या राष्ट्रीय मार्गापासून तवा जंक्शनपर्यंतच्या सुमारे ३२ किमी वाढवणशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या कामाची अधिसूचनाही जारी केली आहे.
भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३(ए) अधिसूचना जारी केल्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने जून २०२४ मध्ये वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर वाढवण बंदरातील जमिनीचा विकास, देखभाल,ड्रेजिंग, रिक्लेमेशन आणि ऑफ शोअर संरक्षणाचे बांधकाम, किनारपट्टी, समुद्रकिनारा आदी पीपीपी तत्वावर विकसित करण्याचे काम जेएनपीएकडे सोपविले असल्याचे उन्मेष वाघ यांनी सांगितले.