नेरळ, कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्म्यांची नावे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 03:47 AM2018-08-28T03:47:10+5:302018-08-28T03:47:14+5:30
कर्जतकरांची मागणी : तालुक्यात सह्यांची मोहीम; खासदारांचा रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू
नेरळ : भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढताना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगड येथे हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना वीरगती प्राप्त झाली. या वीरांच्या नावातून कर्जतचा जाज्वल्य इतिहास जगाला कळावा व त्यांचे कायम स्मरण राहावे, यासाठी कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल व नेरळ रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील स्थानक नाव मिळावे, यासाठी कर्जत तालुक्यात गावागावात सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहनांमधून अनाऊसमेंट करून आवाहन करण्यात येत आहे. यासंदर्भात अवसरे येथे रविवार एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक तरुण सदस्य उपस्थित होते.
सिद्धगडावर स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगडावर येथे वीरगती प्राप्त झाली, ते हुतात्मे झाले. तेथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा ज्योत उभारण्यात आली आहे. तिथे दिवाळीत एक दीप शहिदांचा या ग्रुपच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात येतो. हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील तसेच क्र ांतिवीरांचे स्मरण व्हावे आणि सिद्धगडचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहावा, हा उद्देश समोर ठेवून दीपावलीनिमित्त दिवे रोषणाईचा उत्सव हा शहिदांचे स्मरण म्हणून कर्जत तालुक्यातील अवसरे, मानिवली, पोशीर व इतर गावांमधील तरु ण साजरा करत असतात. गतवर्षी तरुणांनी कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा भाई कोतवाल व नेरळ रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव मिळावे ही संकल्पना मांडली.
च्एक दीप शहिदांचा या ग्रुपने व क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानने मावळचे खासदार श्रीरंग बारणे व भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांना काही महिन्यांपूर्वी निवेदने देण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही खासदारांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू केला आहे. कर्जत रेल्वे स्थानकाचे शहीद भाई कोतवाल कर्जत रेल्वे स्थानक व नेरळ रेल्वे स्थानकाचे शहीद हिराजी पाटील नेरळ रेल्वे स्थानक असे नामकरण व्हावे अशी सर्व कर्जत तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे, यासाठी अवसरे येथे बैठकीचे आयोजन केले होते.