चॉकलेटचे दहा रॅपर द्या अन् एक कॅडबरी मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:33 PM2019-08-30T23:33:17+5:302019-08-30T23:34:17+5:30
कर्जत नगरपरिषदेचा उपक्रम : विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृतीसाठी अनोखा फंडा
कर्जत : शाळेच्या परिसरात कचरा टाकू नये यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कर्जत नगरपरिषदेने अनोखी युक्ती काढली आहे. चॉकलेटच्या दहा रॅपरवर विद्यार्थ्यांना एक कॅडबरी मिळणार आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झालेल्या स्वच्छता सर्व्हेमध्ये कर्जत नगरपरिषदेचे देशात पहिल्या पन्नासमध्ये नाव आहे. त्यामुळे कर्जत नगरपरिषदेला ५ कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे. त्यामधील अडीच कोटींची रक्कम नगपरिषदेच्या खात्यात जमा झाली आहे. उरलेल्या अडीच कोटींचा धनादेश बक्षीस समारंभात देण्यात येणार आहे. बक्षिसाची रक्कम स्वच्छता व पाणी योजनेवर खर्च करण्यात येणार असून २०२० स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आपल्या शहराला देशात पहिले आणायचे असल्याचा निर्धार मुख्याधिकारी कोकरे यांनी व्यक्त केला असून त्यास सभागृहाने संमती दर्शवली.
कर्जत नगरपरिषद क्षेत्रात स्वच्छतेविषयी, कचरा वर्गीकरणाविषयी बऱ्यापैकी जागृती झाली आहे. शाळेच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी येणारा ओला कचरा यामध्ये चॉकलेट, कॅडबरी, शाम्पू, छोट्या मसाल्याच्या पुड्या यांचे वर्गीकरण योग्य प्रकारे होत नाही, रिकामी पाकिटे नगरपरिषदेमध्ये जमा केल्यास प्रत्येक दहा नगासाठी एक कॅटबरी बक्षीस देण्याची संकल्पना सभागृहात मांडली, तसे पत्र सर्व शाळांना देण्यात आले.
च्मुले शाळेत जाताना किंवा शाळेतून घरी जाताना चॉकलेट, वेफर्स खात असतात ते खाऊन झाली की चॉकलेट किंवा वेफर्सची रिकामी पाकिटे रस्त्यावर टाकतात. त्यामुळे त्याठिकाणी छोट्या छोट्या रॅपरचा कचरा मोठ्या प्रमाणात होतो.
च्मुलांनी तो कचरा रस्त्यावर टाकू नये म्हणून दहा रॅपरवर एक कॅटबरी देण्याचे नगरपरिषदेने कबूल केले आहे. मुलांनी हे रॅपर नगरपरिषद कार्यालयात जमा करायचे आहे व कॅटबरी न्यायची आहे.
च्शाळेतील मुले नवीन चांगल्या गोष्टी लहान वयात शिकत असतात, त्यांच्या शरीराला शालेय वयात एक चांगले वळण लावण्यासाठी आपण खाल्लेले चॉकलेट किंवा वेफर्स याचा रॅपर रस्त्यावर न टाकता ते खिशात ठेवून शाळेतील किंवा घरच्या डस्टबिनमध्ये टाकले पाहिजे यासाठी नगरपरिषदेने हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.
च्उपक्रमास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, विद्यार्थ्यांनी आणलेले रॅपर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी स्वीकारले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, बांधकाम सभापती राहुल डाळींबकर, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, लिपिक रवींद्र लाड, शेखर लोहकरे आदी उपस्थित होते.
च्अनोख्या उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. यामुळे विद्यार्थीही स्वच्छतेबाबत जागृत होत आहे.