नवदाम्पत्यांना द्या ‘युगल सुरक्षे’ची लग्न भेट; विमा पॉलिसी, रायगड डाक विभागाकडून आवाहन
By निखिल म्हात्रे | Published: May 1, 2024 07:24 PM2024-05-01T19:24:40+5:302024-05-01T19:27:31+5:30
लग्नात भेट देणे ही आपली संस्कृती असून, डाक विभागाने ‘युगल सुरक्षा’ नावाची नवी विमा पॉलिसी काढली आहे.
अलिबाग : लग्नात भेट देणे ही आपली संस्कृती असून, डाक विभागाने ‘युगल सुरक्षा’ नावाची नवी विमा पॉलिसी काढली आहे. रायगड डाक विभागाकडून आपल्या एका कर्मचाऱ्याच्या लग्नात या पॉलिसीचे अनोखे अनावरण करीत त्याला या पॉलिसीची भेट देण्यात आली. लग्नात नवविवाहित दाम्पत्याला आप्तेष्ट वेगवेगळ्या भेटवस्तू देत असतात. अनेकांना काय द्यावे, हा प्रश्न पडतो. यावर एक चांगला पर्याय डाक विभागाने उपलब्ध केला आहे. रायगड डाक विभागात कार्यरत मयूर भोईलकर (रा. आंबेपूर) याच्या लग्नात त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला ही ‘युगल सुरक्षा’ नावाची विमा पॉलिसी काढून त्याचे विमापत्र लग्नात भेट दिले. सर्वसामान्यांना याबाबत माहिती व्हावी यासाठी रायगड डाक विभागाने ही अनोखी शक्कल लढवली. याप्रसंगी रायगड डाक अधीक्षक सुनील थळकर, सहायक अधीक्षक सुनील पवार, पोस्टमास्टर गजेंद्र भुसाणे, संतोष चिपळूणकर आदी उपस्थित होते.
काय आहे पॉलिसी?
५ ते २० वर्षे मुदत असणारी ही विमा पॉलिसी लग्न केलेल्या व्यक्तीलाच काढता येते. लग्नाच्या दिवशी या पॉलिसीचा प्रीमियम भरून भेट देता येऊ शकते. एकच पॉलिसी, एकच विमा हप्ता असे त्याचे स्वरूप आहे. २० वर्षे मुदतीसाठी सामाहिक वय २१ असलेल्या जोडप्यासाठी १ लाख विम्यासाठी रु. ४२० व ४० वर्षे सामाहिक वय असलेल्या जोडप्यासाठी रु. ४७० दरमहा इतका कमी विमा हप्ता आहे. मुदतपूर्तीनंतर आताच्या व्याजदराप्रमाणे साधारण २ लाख ४ हजार रुपये मिळतात. विम्याच्या कालावधीत दोघांपैकी एकाचे काही झाले तर दुसऱ्याला बोनससहित विम्याची पूर्ण रक्कम मिळते. मुदतीमध्ये काही झाले नाही तरीही मुदतपूर्तीनंतर विम्याची पूर्ण रक्कम व बोनस विमाधारकास मिळतो.