राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : रायगड पोलीस दलात २०१६ रोजी झालेल्या पोलीस भरतीत सिध्देश पाटील याने बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. सिध्देश याने बनावट प्रमाणपत्र देऊन शासकीय नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने शासनाची फसवणूक केल्याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सिध्देश हा सध्या गडचिरोली पोलीस भरतीत झालेल्या बोगस प्रमाणपत्र प्रकरणात अटक आहे.
सिध्देश हा मूळचा अलिबाग तीनविरा येथील रहिवासी आहे. असे असताना सिध्देश याने बीड जिल्ह्यातून प्रकल्पग्रस्त असल्याचा बोगस प्रमाणपत्र तयार करून घेतले होते. २०१६ साली रायगड जिल्ह्यात भरती प्रक्रिया झाली होती. या भरती प्रक्रियेत सिध्देश याने प्रकल्पग्रस्त म्हणून अर्ज केला होता. भरतीमध्ये तो प्रकल्पग्रस्त म्हणून पात्र होऊन रायगड पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाला. २०१६ ते २०२३ या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी काम केले.
२०२३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पोलिस भरतीत बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन पाच उमेदवार भरतीला उतरले होते. गडचिरोली स्थानिक गुन्हे विभागाने बोगस प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणात रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई सिध्देश पाटील याचाही सहभाग असल्याने गडचिरोली पोलिसांनी अलिबाग येथून अटक केली आहे. त्यामुळे सिध्देश यांनीही दिलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचा तपास अलिबाग स्थानिक गुन्हे विभागाकडून सुरू होता.
सिध्देश याने दिलेले प्रमाणपत्र हे बोगस असल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क.४२०,४६७,४६८,४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास महेश कदम सपोनि स्थागुअशा रायगड अलिबाग हे करीत आहेत. बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत सिध्देश हा आठ वर्ष नोकरी करीत होता. त्यामुळे या काळात दिलेले वेतन आणि इतर भत्ते हे वसूल केले जाण्याची शक्यता आहे.