विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या मुलाला जीवनदान; पालिकेच्या विद्युत विभागाची तत्परता
By वैभव गायकर | Published: July 21, 2023 06:20 PM2023-07-21T18:20:31+5:302023-07-21T18:20:56+5:30
एकीकडे मुसळधार पाऊस आणि पावसाच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाला पनवेल महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले आहे.
पनवेल : एकीकडे मुसळधार पाऊस आणि पावसाच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाला पनवेल महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले आहे. दि.19 रोजी रात्री दहाच्या सुमारास दिबा पाटील नगर परिसरातील ही घटना आहे.
मंथन तारे (15) असे या मुलाचे नाव असुन मंथन ची प्रकृती उत्तम आहे.महावितरणची ओव्हरहेड वायर रस्त्यावर पडून तिचा विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने याठिकाणाहून जाणारा मंथनला या विजेचा जोरदार झटका बसल्याने तो बेशुद्ध पडला. महावितरण कडून प्रतिसाद मिळत नसल्याने या ठिकाणच्या काही नागरिकांनी पालिकेच्या विद्युत विभागाला ही बाब सांगितली. यावेळी तत्काळ अग्निशमनचे कर्मचारी, विद्युत विभागाचे अधिकारी प्रीतम पाटील, इलेक्ट्रीशन नितीन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांनी ओव्हरहेड बाहेर बाजूला केली.
त्यानंतर प्रीतम पाटील यांनी पालिकेच्या एम्बुलन्स मधून उपजिल्हा रुग्णालय गाठत मंथन ला रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच उपायुक्त सचिन पवार हे देखील उपजिल्हा रुग्णालयात पोहचले.प्राथमिक उपचार केल्यानंतर मंथनला उपजिल्हा रुग्णालयातून हालवून एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.तत्काळ मदत मिळाल्याने मंथनचे प्राण वाचले. दरम्यान पालिकेचे विद्युत विभाग अथवा अग्निशमन दलाने तत्परता दाखवत घटनास्थळी पोहचून लागलीच मंथनला रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राण वाचविल्याने आयुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
विद्युत विभाग तसेच अग्निशमन दलाने तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली.महावितरणची ओव्हर हेड वायर बाजूला सारून तत्काळ या जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.यामुळे त्याचे प्राण वाचले.त्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केलेच पाहिजे. - गणेश देशमुख (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)