परिवर्तनाच्या प्रयत्नांचा गौरव
By Admin | Published: January 26, 2017 04:39 AM2017-01-26T04:39:41+5:302017-01-26T04:39:41+5:30
धर्माधिकारी घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधन कार्याची परंपरा असून, ही परंपरा तिसऱ्या पिढीचे ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
अलिबाग : धर्माधिकारी घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधन कार्याची परंपरा असून, ही परंपरा तिसऱ्या पिढीचे ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सातासमुद्रापार घेऊन जाण्यात यश मिळविले असतानाच, बुधवारी भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर केल्याने, देश-परदेशातील बैठकांमध्ये आनंदाची लाटच पसरली आहे.
आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची बैठकांमधून मशागत करताना, निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ज्येष्ठ निरूपणकार डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरु षार्थाची ओळख त्यांनी, स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. त्यातून मानव निर्मितीचे अनन्यसाधारण कार्य केले. बैठकांच्या मौखिक निरूपणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरू
करून, त्याचाच भाग म्हणून त्यांनी हाती घेतलेल्या पर्यावरण रक्षण आणि संरक्षणाच्या मोहिमेत लाखो बैठक सदस्य सहभागी झाले आणि कोट्यवधी वृक्षलागवड त्यातून झाली.
आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीसाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईसह देशभरातील विविध शहरांमध्ये ज्या स्वच्छता मोहिमा बैठकीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्या, त्या माध्यमातून आरोग्यसंपन्न समाजनिर्मिती होत असतानाच, या मोहिमांची नोंद ‘गिनिज बुक’मध्ये झाली. मराठवाड्यासह राज्यातील जलदुर्भीक्षावर जनसहभागातूनच मात करण्याकरिता जलसंवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून, शेकडो गावांमध्ये उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्यात यश मिळते आहे. (विशेष प्रतिनिधी)