श्रीवर्धन : लोकशाहीत निवडणूक राष्ट्रीय उत्सव मानला जातो. मतदान हे आद्य कर्तव्य मानले आहे. या वषीचा विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. राजकीय पक्ष व नेते मंडळी, कार्यकत्यांची धावपळ चालू आहे. त्याचवेळी प्रशासकीय यंत्रणा आपल्या कर्तव्या प्रती तत्पर दिसत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे सर्वत्र पालन होत आहे. प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीचे नियोजन सरकारी यंत्रणा करत आहे. श्रीवर्धन मतदारसंघात ३४६ मतदान केंद्रावर १ हजार ६८९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये १ हजार ४९ पुरूष कर्मचारी तर ६४० स्त्री कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला आहे.
मतदार संघातील मतदार केंद्र संख्या तालुक्यानुसार श्रीवर्धन ९० केंद्र ,म्हसळा ७० केंद्र ,तळा ५५ केंद्र, माणगाव ७४ केंद्र, रोहा ५७ केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. मतदार संघातील स्त्री पुरुष गुणोत्तरानुसार १ लाख ३१ हजार ४३१ स्त्री मतदार व १ लाख २६ हजार १०१ पुरुष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील पोलीस खात्याने निवडणूक काळात शांतता भंग होऊ नये तसेच सर्वसामान्य मतदाराने निर्भयपणे मतदान करावे यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदारसंघातील श्रीवर्धन शहर, बोर्ली पंचतन, म्हसळा, माणगाव, रोहा, तळा या सर्व ठिकाणी ४ अधिकारी, २० कर्मचारी, राखीव दल ४० आणि होमगार्ड १२ यांचे संयुक्तीक पथसंचलन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधीक्षक बाबुराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदारसंघातील विविध ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तपासणी पथके कार्यरत आहेत. मतदारसंघातील अनेक वाहनांची तपासणी नियमीत केली जात आहे. मद्य, पैसे, किंबहुना इतर कोणत्याही मार्गाने निवडणुकीस बाधा येईल, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे लक्ष ठेवले जात आहे. एसटी महामंडळाच्या बसेस गाव निहाय केंद्रावर पाठवण्याचे नियोजन आगार प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
एसटी बसेसचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यात आले आहे. त्यानुसार, कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. मतपेट्यांची वाहतूक व्यवस्थित पार पाडली जाईल. श्रीवर्धन आगारतून ९४ बसेस यासाठी कामी वापरण्यात येणार आहेत.- एम. जी. जुनेदी, आगार प्रमुख, श्रीवर्धनविधानसभा निवडणुकीची सर्व तयारी झाली आहे. निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या सर्व बाबींचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. ३९४ मतदान केंद्र अधिकारी व ३९६ सहाय्यकांची नियुक्ती केली आहे. मतदारसंघातील अवैध कृतीवर तात्काळ कारवाई केली जाईल.- अमित शेडगे, प्रांताधिकारी, श्रीवर्धननिवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल तयार आहे. जनतेने निर्भय मतदान करावे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलीस प्रशासनाने काळजी घेतली आहे.- प्रमोद बाबर,पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन