शंभरी पार ‘लोकशाही रक्षक’ चार ज्येष्ठ मतदारांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:04 AM2019-04-24T00:04:40+5:302019-04-24T00:05:09+5:30
विविध केंद्रांवर मतदान; भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन
अलिबाग : आयुष्याची १०० वर्षे पार केलेल्या आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या रक्षक बनलेल्या चार ज्येष्ठ मान्यवर महिला मतदार निवडणूक आयोगाच्या शिष्टाचारात निवडणूक यंत्रणेच्या वाहनातून मतदान कें द्रावर आल्या. त्यांचा त्याच मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाकडून गौरव करण्यात आला. या घटनेने रायगडलोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह रायगडची संपूर्ण निवडणूक यंत्रणा सुखावली.
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वप्रथम १९५२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावत असलेल्या महाड तालुक्यातील आमशेत या छोट्या गावातील ११० वर्षांच्या वयोवृद्ध गंगूबाई चव्हाण या यंदाच्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत देखील मतदान करणार याबाबत थेट गंगूबाई चव्हाण यांची मुलाखत रविवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. याची तत्काळ दखल रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घेतली. १०० पार केलेल्या ज्येष्ठ मान्यवर मतदारांचा मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष सत्कार तर ज्येष्ठ मतदारांचे मतदान केंद्रावर स्वागत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मंगळवारी सकाळी गंगूबाई चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदानाकरिता आणण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने महाड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार स्वत: आपले शासकीय वाहन घेऊन गेले होते. मतदानानंतर गंगूबाई चव्हाण यांचा इनामदार यांनी गौरव करून पुन्हा त्यांना त्यांच्या घरी सोडले. या साºया मानसन्मानाने चव्हाण कुटुंबीय भारावून गेले होते.
महाड विधानसभा मतदारसंघातील १०८ वर्षांच्या ज्येष्ठ मतदार सुलोचनाबाई गोविंद देशमुख यांनी देशमुख कांबळे मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यावर महाड विधानसभा मतदारसंघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने त्यांचा गौरव केला. सुलोचनाबाई व त्यांच्या कुटुंबातील मतदार सदस्यांना मतदान केंद्रावर आणून परत घरी सोडण्याकरिता रायगड निवडणूक यंत्रणेकडून विशेष वाहन व्यवस्था केली होती. सुलोचनाबाई यांनी पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदार संघात झालेल्या १९५२ मधील पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून आजवर १७ लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे. लोकसभा ते ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुकीत त्यांनी न चुकता मतदान करून आगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांनी घालून दिलेला आदर्श आम्ही पुढे चालू ठेवला असून देशमुख कुटुंबातील सर्व मतदार मतदानाचा हक्क न चुकता बजावत असल्याची माहिती या निमित्ताने त्यांचे चिरंजीव दिलीप गोविंद देशमुख यांनी दिली. तर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे.
लोकशाहीचे खरे पाईक असणारे शंभरी ओलांडलेले ज्येष्ठ मतदार यांना सन्मानाने आणून गौरव करणे या साºयाच सोहळ््याने आम्ही भारावून गेलो आहोत, अशी प्रतिक्रिया सुलोचनाबाई यांचे नातू अॅड. देशमुख यांनी दिली आहे.
१०३ वर्षीय वीरपत्नी लक्ष्मीबाईंचा गौरव
माणगाव तालुक्यातील पाटणूस येथील ब्रिटिश आर्मीतील व्हिक्टोरीया क्र ास सन्मान प्राप्त शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांच्या १०३ वर्षांच्या वयोवृद्ध वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांचा ज्येष्ठ मतदार म्हणून पाटणूस मतदान केंद्रावर, त्यांनी मतदान केल्यावर माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गौरव केला. वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे आणि त्यांच्या कुटुंबातील मतदार सदस्यांना निवडणूक यंत्रणेच्या वाहनाने अत्यंत सन्मानाने मतदान केंद्रावर आणून मतदान व गौरव सोहळ्याअंती पुन्हा त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था तहसीलदार प्रियंका आयरे यांनी केली होती.
१०३ वर्षांच्या सीता मोरे यांचा पाली मतदान केंद्रावर गौरव
पेण विधानसभा मतदारसंघातील पाली-सुधागड येथील मतदान केंद्र क्रमांक २६५ येथे मतदान करणाºया १०३ वर्षांच्या ज्येष्ठ मान्यवर मतदार सीता मोरे यांचाही पाली तहसीलदार दिलीप रैनावार आणि त्यांच्या सहकाºयांनी स्वागत करून गौरव केला.