निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा लागणार पणाला
By admin | Published: January 31, 2017 03:40 AM2017-01-31T03:40:04+5:302017-01-31T03:40:04+5:30
रायगड जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, भाजपाचे रामशेठ
- आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, भाजपाचे रामशेठ ठाकूर, काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील, काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, माजी आमदार माणिक जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. परंतु निवडणुकीच्या धामधुमीत अलिबाग तालुक्यातील थळ मतदार संघ हा सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या नजरा या मतदार संघावर खिळणार आहेत.
थळ मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी निवडणूक लढविणार आहेत. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पराकोटीचे नाराज असलेले महेंद्र दळवी थळ मतदार संघातील लढत प्रतिष्ठेची करणार आहेत. त्यामुळे वाघाच्या तोंडात कोण हात घालणार हे लवकरच समजणार आहे. २००६ साली झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महेंद्र दळवी आणि त्यांच्या पत्नी मानसी दळवी हे शेकापमध्ये होते. शेकापने त्यावेळी मानसी यांना उमेदवारी दिली होती. मानसी यांच्या विरोधात काँग्रेसच्या अनुराधा म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मानसी या तब्बल सात हजार २१४ अशा प्रचंड मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार होत्या मात्र शेकापने त्यांना अध्यक्षपदी विराजमान न केल्याने अध्यक्षपदाला हुलकावणी मिळाली होती. त्यावेळी महेंद्र दळवी कमालीचे संतप्त झाले होते. त्याबाबत त्यांनी शेकाप नेतृत्वावर जहाल टीका केली होती.
शेकापचा लालबावटा खाली ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधले. २०११ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने थळ मतदार संघातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी आमदार जयंत पाटील आणि आमदार सुनील तटकरे हे एकमेकांचे राजकीय वैरी होते. शेकापचे पाटील यांनी त्यांच्या मुलगा नृपाल पाटील यांना उमेदवारी दिली. दळवी यांच्या विरोधात नृपाल यांचा दोन हजार ८१ मतांनी दारुण पराभव केला होता. त्यावेळीही पाटील आणि दळवी यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आमदाराच्या मुलाचा दारुण पराभव करणारे दळवी यांची ओळख बनली. तटकरे यांनीही त्यांना अध्यक्षपदी बसविले नसल्याचे कारण देत दळवी यांनी पक्ष सोडला. त्यांनी नंतर आता शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी मानसी यांना आताच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. त्या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात. शिवसेनेची ताकद वाढल्याने रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता येईल असा विश्वास त्यांना वाटत आहे. त्यामुळे महेंद्र हेही निवडणूक प्रतिष्ठेची करणार यात शंका असण्याचे कारण नाही.
शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या उमेदवारांची यादी ३१ जानेवारीला जाहीर करणार आहेत. त्यामुळे थळ मतदार संघातून कोण लढणार हे लवकरच कळणार आहे.
अदिती तटकरे निवडणूक रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश करीत आहेत. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तटकरे यांची आहे. तसेच तटकरे हे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना राज्यातील निवडणुका जिंकण्यावरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपविण्यात आल्याने निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना निवडणूक प्रतिष्ठेची करावी लागणार आहे.