कर्जत : मुंबई - पुणे या मेन लाइनवरील रेल्वे मार्गावर दुपारी नेरळ येथील रेल्वे फाटकात मोठा अपघात होता होता टळला. त्या ठिकाणी ट्रेन येणार म्हणून स्वयंचलित फाटक बंद करण्यात आले. मात्र त्या वेळी रूळ ओलांडत असलेली एक कार आणि तीन दुचाकी वाहने आतमध्ये अडकून पडली. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी अथवा नुकसान झाले नाही. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
फाटक बंद होत असताना एक चार चाकी वाहन नेरळ गावातून पलीकडे जाण्यासाठी रूळ ओलांडू लागले परंतु त्या वेळी लोकल गाडीने नेरळ स्थानक सोडले होते. त्यामुळे कार चालकाने घाबरून गाडी फाटकाच्या आतमध्ये उभी केली. तर त्यासोबत आणखी तीन दुचाकीदेखील तेथे अडकून पडल्या होत्या. त्या वेळी लोकल आणि तेथे अडकून पडलेल्या दुचाकी आणि कार यांच्यातील अंतर काही सेंटीमीटरचे होते.
केवळ दैव बलवत्तर म्हणून फाटकात अडकून पडलेली गाडी आणि लोकल गाडी यांचा अपघात झाला नाही. अपघात झाला असता तर त्या कारमध्ये बसलेले चार प्रवासी जखमी झाले असते आणि त्या तीन बाइकस्वारांनादेखील दुखापत झाली असती. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून फाटक उघडताच तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या कारचा आणि दुचाकी यांचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत.