स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:54 PM2019-11-14T23:54:32+5:302019-11-14T23:54:39+5:30

‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत.

Goes out of the kitchen, overcrowded, lost the identity of rural life | स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली

स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली

Next

गिरीश गोरेगावकर 
माणगाव : ‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत. त्यामुळे प्रसन्न अशी पहाट होत असे. मात्र, काळानुरूप अशी पहाटही कालबाह्य झाली असे म्हणावे लागेल. कारण एकेकाळी जाते ही ग्रामीण जीवनाची खरी ओळख होती. ग्रामीण जीवनाची पहाट या जात्याच्या आवाजानेच व्हायची. प्रत्येक घरी जाते असायचे. या जात्याची घरघर पहाटे सुरू व्हायची. त्यामुळे पूर्वी आपोआपच सारे गाव जागे व्हायचे व दळण दळताना पहाटेची गाणी, ओव्या, भुपाळ्या, भारुडे गाऊन धान्य दळले जात असे व उखळीतून धान्य सडून तांदूळ काढले जात असत.
पिठाच्या गिरण्या सुरू होण्यापूर्वी प्रत्येक कुटुंब जीवनात जात्याला महत्त्व देत होते. किंबहुना ते एक महत्त्वाचे साधन होते. पूर्वी पहाटे जात्यावर दळणाऱ्या महिलांच्या मुखातून अमृतमधुर ओव्या ऐकायला मिळायच्या. तसेच जाते चालविल्याने व उखळीतून धान्य सडल्याने चांगला व्यायामसुद्धा होत होता. मात्र, बदलत्या काळानुसार आजच्या युगातील उच्चशिक्षित महिला जुन्या गोष्टी अवलंबताना दिसत नाहीत. आता जात्यावरच्या त्या पारंपरिक ओव्या पुस्तकात बंद झाल्या आहेत.
पूर्वी गावोगावी लाइटची सोय नसायची. बाजाराच्या ठिकाणीच लाइटची सोय असल्याने पिठाच्या गिरणी व भात गिरणी बाजारात असायच्या. ग्रामीण भागात पिठाची गिरणी व भात गिरणी नसल्यामुळे आम्हाला जात्यानेच धान्य दळणे व उखळातून तांदूळ सडणे, अशी कामे भल्या पहाटे करावी लागत होती. आता सर्वच ठिकाणी पिठाच्या गिरण्या व भात गिरण्या उपलब्ध झाल्याने जाते व उखळ क्वचितच दिसतात, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक पिठाबाई खाडे यांनी दिली.

Web Title: Goes out of the kitchen, overcrowded, lost the identity of rural life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.