गोगावलेंचे प्रतिज्ञापत्र गुन्हेगारीने भरलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:03 AM2019-04-10T00:03:16+5:302019-04-10T00:03:26+5:30
सुनील तटकरे यांची टीका : बिरवाडी येथे प्रचारसभा
बिरवाडी : महाडचे आमदार भरत गोगावले यांचे प्रतिज्ञापत्र गुन्हेगारीने भरलेले असल्याची टीका आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी महाड तालुक्यातील बिरवाडी येथील श्लोक क्र ीडा नगरी येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत केली आहे.
सुनील तटकरेंविरु द्ध एक साधी एनसीदेखील दाखल नाही. सिंचन घोटाळ्याबाबत गेली पाच वर्षे आपली चौकशी सुरू आहे, याबाबतची माहिती आपण निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिली आहे. मात्र, त्याबाबत गेल्या पाच वर्षांत कोणती कारवाई झालेली नाही असे तटकरे यांनी सांगितले. आमदार गोगावले यांनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी आपले गुन्हेगारीने भरलेले प्रतिज्ञापत्र तपासून पाहावे. बिरवाडी गावामध्ये कोट्यवधी रु पयांची विकासकामे सुनील तटकरे यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत, ही वस्तुस्थिती आमदार भरत गोगावले आणि खा. अनंत गीते नाकारू शकत नाहीत. खा. अनंत गीते यांनी आपल्या पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळांमध्ये मतदारसंघातील गावांमध्ये शौचालय उभारणे, याव्यतिरिक्त कोणतेही काम केलेले नाही. विकास गोगावले हे सर्वांची कुंडली आपल्याकडे असल्याची भाषा करतात, यावर भाष्य करताना सुनील तटकरे यांनी आपले वय काय? आपण बोलतो काय? असे सांगून आपल्याबाबतची माहितीदेखील आमच्याकडे उपलब्ध आहे. मात्र, पोरकट मुलांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही, असे सांगितले.
माजी आमदार माणिकराव जगताप यांनी आपल्या भाषणात महाड एमआयडीसीमधील दहशत संपवून टाकू, असा इशारा देत शिवसेनेकडे केंद्रात आणि राज्यात उद्योग मंत्रिपद असतानादेखील कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत, अशी टीका केली. बंद पडलेल्या कारखान्यांमधून केवळ भंगार गोळा करण्याचे काम हे शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरू आहे.
बिरवाडी परिसरातील विकासकामे ही आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाली. मात्र, बिरवाडी पाणी योजनेमध्येही संबंधित ठेकेदारांनी भ्रष्टाचार केला आहे. अनंत गीते यांनी गेली ३० वर्षे या परिसरातील विकासकामे के ली नाहीत, अशी टीका के ली.शिवसेनेचे दिवंगत नेते सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून, या प्रकरणीदेखील लक्ष घालणार असल्याचा पुनरुच्चार माजी आमदार माणिकराव जगताप यांनी केला. या वेळी राष्ट्रवादीचे सुभाष निकम आदी मान्यवर उपस्थित होते.