निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : होळीसाठी रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. यंदा लहानगे गॉगल पिचकाऱ्यांना अधिक पसंती देत आहेत. तर मुखवट्यांमध्ये पक्षी, प्राणी, कॉमिक्समधील हिरो, कार्टुनमधील पात्रांचे मुखवटे खरेदी करण्याकडे त्यांचा अधिक कल आहे.
इकोफ्रेंडली होळीत वेगळेपणा आणण्यासाठी बहुतेकांचा विनोदी, भयावह, पक्षी, प्राणी, कॉमिक्समधील हिरो कार्टुनमधील पात्रांचे चेहरे असलेले मुखवटे घालण्याकडे कल आहे. मुले, युवक, युवतींसह ज्येष्ठांनाही या मुखवट्यांचे आकर्षण असल्यामुळे त्यांची बाजारातील मागणी चांगलीच वाढली आहे.होळीच्या या पाच दिवसांत शहरासह जिल्हाभरात पैशाची चांगलीच उलाढाल होत असते. अगदी ३० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंतचे प्लॅस्टिक, रबरी मुखवटे बाजारात आले आहेत. त्यांना मागून कापडाने शिवल्यामुळे ते चेहऱ्यावर घातले की, मानेपर्यंत संपूर्ण चेहरा झाकला जातो. त्यामुळे मुखवटा घातलेली व्यक्ती कोण, हे सहज ओळखता येत नाही.
हृदय, चक्र, चांदणी या आकाराचे लाइट्स चमकणारे गॉगलही सध्या भाव खाऊन जात आहेत. क्रिश चित्रपटातील गॉगल पिचकारीला लहान मुले तरुणांची चांगलीच पसंती मिळत आहे. एव्हाना पिचकाऱ्यांचे आकारही चांगलेच देखणे मजबूत आले असून, पारंपरिक पिचकाऱ्यांसह पंपाद्वारे पाणी सोडणाऱ्या विविधरंगी लहानमोठ्या आकाराच्या ५० ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या पिचकाऱ्या बाजारात दिसत आहेत.चीनमधून आवक ५० टक्क्यांनी घटली
आजवर होळीच्या बाजारावर चिनी वस्तूंची पूर्णत: छाप दिसायची. मात्र, यंदा बाजारात सुमारे ५० टक्क्यांनी चिनी वस्तूंची आवक घटली आहे. भारतीय पिचकाऱ्या, रंग, गुलाल, मुखवटे, चष्मे, टोप, टोप्या, विग चायनीज वस्तूंपेक्षा दर्जेदार, टिकाऊ आणि किफायती असल्याचे खुद्द ठोक विक्रेत्यांनीही मान्य केले आहे.हार-बांगड्याची मोठी विक्री
धुळवडीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या नैसर्गिक रंगांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याचप्रमाणे होळीनिमित्त पूजेसाठी लागणारे हार-बांगड्यांची देखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली. होळीला हार-बांगड्यांना विशेष महत्त्व असल्याने विक्रेत्यांनी बाजारात हार-बांगड्यांची दुकाने थाटली होती. प्रति किलो १२० रुपये याप्रमाणे याची विक्री झाली. यावर्षी दरात २० टक्के वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.