महाडमधील गोकुळेश इमारतीला गेले तडे
By admin | Published: February 26, 2017 03:00 AM2017-02-26T03:00:19+5:302017-02-26T03:00:19+5:30
शहरातील भोईआळी येथील गोकुळेश रहिवासी संकुलाच्या इमारतीला मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून, आज पहाटे एक कॉलम अचानक खचल्याने इमारतीमधील रहिवाशांमध्ये
महाड : शहरातील भोईआळी येथील गोकुळेश रहिवासी संकुलाच्या इमारतीला मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून, आज पहाटे एक कॉलम अचानक खचल्याने इमारतीमधील रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली आहे. या इमारतीमधील सर्व २३ फ्लॅटधारकांना आपले फ्लॅट्स त्वरित खाली करण्याच्या सूचना नोटिसीद्वारे नगरपरिषदेने दिलेल्या आहेत.
भोई आणि गांधी टॉकीज जवळच आठ वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आलेली असून बिल्डर अंकित धारिया यांनी या इमारतीचे बांधकाम केलेले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या इमारतीच्या भिंतीना तडे जाण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी आरसीसी कॉलम आणि बिम्सनाही मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याचे या इमारतीतील रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत संबंधात बिल्डर्स अंकित धारिया यांच्याकडे रहिवाशांनी तक्रारीही केल्या. मात्र, त्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
शनिवारी पहाटे या इमारतीच्या मध्यभागी असलेल्या कॉलमला अचानक तडे जाऊन त्यातील काँक्रीट खाली कोसळल्याचे तेथील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. याबाबतची माहिती मिळताच नगराध्यक्षा स्नेहल जगताप, नगरअभियंता शशिकांत दिघे, सुधीर म्हात्रे आदींनी घटनास्थळी भेट देऊन इमारतीची पाहणी केली. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व नागरी १९६५चे कलम १९५ अन्वये सदरची इमारत धोकादायक असल्याचे कारण नमूद करून सर्व फ्लॅटधारकांना फ्लॅट्स खाली करण्याच्या सूचना नगरपरिषदेने माहिती नगरअभियंता शशिकांत दिघे यांनी दिली. (वार्ताहर)
इमारतीची दुरवस्था...
इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे, नगरअभियंता गोकुळेश इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे.
अनेक ठिकाणी भिंती व कॉलमला तडे गेले आहेत. या इमारतीचे सर्वात आधी स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे, अशा प्रकारची नोटीसही रहिवाशांना देण्यात यावी, अशी माहिती नगरअभियंता शशिकांत दिघे यांनी दिली.