सोने खरेदी व्यवसायात ४० टक्क्यांची घसरण; वाढत्या दरामुळे सोन्याची झळाळी काळवंडली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 10:56 PM2019-10-27T22:56:12+5:302019-10-27T22:56:24+5:30
या दिवशी विविध सोने विक्रीच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी असणारी ग्राहकांची गर्दी या वर्षी कमी असल्याचे दिसून आले आहे.
अलिबाग : साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. सोन्याचे वाढते दर आणि आर्थिक मंदीचा फटका सोने विक्रेत्यांना बसला असल्याचे ग्राहकांच्या अल्प प्रतिसादावरून दिसून येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के उलाढालीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे सोने विक्री व्यवसायाला म्हणावी तशी झळाळी मिळाली नसल्याचे दिसून येते.
दिवाळी हा सण सर्वच स्तरामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. या सणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या दिवशी सोने, चांदीची नाणी खरेदीची उलाढाल प्रचंड होते. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी सोन्याचे दर हे तब्बल ११ हजार रुपयांनी वाढल्याने या वर्षी दिवाळीत सोने खरेदीचा उत्साह कमी असल्याचे दिसून आले आहे.
या दिवशी विविध सोने विक्रीच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी असणारी ग्राहकांची गर्दी या वर्षी कमी असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी सोन्याचा दर २७ हजार रु पये तोळा असा होता. त्यामध्ये या वर्षी ११ हजार रुपयांनी वाढ होऊन तो आता ३८ हजार रु पयांच्या घरात पोहोचला आहे. त्याचा परिणाम या वर्षी सोने खरेदीवर होत असल्याचे ग्राहकांच्या प्रतिसादावरून दिसून येते. आर्थिक मंदीबरोबरच सोन्याच्या वाढत्या दराचा हा सर्व परिणाम असल्याचे ज्वेलर्सचे व्यवस्थापक नितीन घरत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने खरेदी करणे हे आपल्या संस्कृतीमध्ये शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवसाची निवड ग्राहक करतात. मात्र, आता त्यामध्ये तब्बल ४० घट झाली आहे, अधूनमधून सोन्याची खरेदी करण्याकडे पूर्वी ग्राहकांचा कल होता. मात्र, वाढत्या दरामुळे फक्त मुहूर्तावरच सोन्याची खरेदी होत असल्याचे घरत यांनी सांगितले.