कर्जत : लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी पोलीस स्थानकात वर्षानुवर्षे जमा असलेला मुद्देमाल सोने, मोबाइल, रोख रक्कम ज्या प्रवाशांची असेल त्या प्रवाशांना कायदेशीर पूर्तता करून देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला असल्यामुळे कर्जत रेल्वे जीआरपी यांनी याबाबतची अंमलबजावणी करण्याचे ठरविले. त्यानुसार कित्येक वर्षांपासून कर्जत जीआरपींकडे जमा असलेला चोरीचा मुद्देमाल फिर्यादींना सोपविला. यामध्ये ३० वर्षांपूर्वी चोरी झालेली सोनसाखळी संबंधित महिलेच्या ताब्यात देण्यात आली आहे.
आतापर्यंत सुमारे १०० च्या वर प्रवाशांना त्यांचा चोरीस गेलेला ऐवज प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन परत करण्यात आला. अशीच एक चोरीची घटना ३१ सप्टेंबर १९८९ मध्ये घडली होती. शेलू येथील महिला तारामती हरिश्चंद्र मसणे आपल्या तीन मुलांसह लोकलने प्रवास करत असताना त्यांच्या आठ वर्षीय मुलाची सोन्याची साखळी गाडीतून उतरत असताना एका महिलेने हिसकावून पळ काढला. ही बाब लक्षात आली असता तारामती मसणे यांनी तत्काळ रेल्वे जीआरपींकडे तक्रार केली.
कायदेशीर पूर्तता होईपर्यंत बराचसा वेळ निघून गेल्याने तारामती मसणे यांनी चोरीला गेलेली सोन्याची साखळी पुन्हा मिळेल याची आशा सोडून दिली होती; परंतु रेल्वे जीआरपी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे चोरीची सोनसाखळी फिर्यादी महिलेस परत करण्यासाठी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत जीआरपीचे पाटील व स्वप्निल मसणे यांनी कायदेशीर तपास पूर्ण करून सुमारे ३० वर्षांपूर्वी चोरीस गेलेली सोनसाखळी शेलू येथील रहिवासी तारामती मसणे यांना सुपूर्द केली. इतक्या वर्षांनी चोरीस गेलेली मुलाची सोनसाखळी पुन्हा मिळाल्याने त्यांनी कर्जत जीआरपी व रेल्वे पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.