मयूर तांबडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, नवीन पनवेल: सोन्याचा वर्ख लावलेली मिठाई तुम्ही चाखली असेल. उज्जैनची सोन्याचा वर्ख लावलेली कुल्फीही प्रसिद्ध आहे. उज्जैनच्या कुल्फीपासून प्रेरणा घेऊन येथे पोळी-भाजी केंद्र चालविणाऱ्याने चक्क सोन्याचा वर्ख लावलेली खास पुरणपोळी तयार केली आहे.
नवीन पनवेल शहरातील शिवा पोळी-भाजी केंद्राचे चालक नारायण कंकणवाडी यांनी सोन्याचा वर्ख लावलेल्या दोन पुरणपोळ्या तयार केल्या. या दोन पुरणपोळ्यांपैकी एक मंदिरात दिली आणि दुसरी त्यांच्या मित्राला भेट दिली. उज्जैनमध्ये गेल्यानंतर कंकणवाडी यांना सोन्याचा वर्ख लावलेली कुल्फी दिसली होती. त्यानंतर त्यांना सोन्याचा वर्ख लावलेली पुरणपोळी बनवावी, असे सुचले. त्यांनी रविवारी ही अनोखी पुरणपोळी बनवली. हा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला.
महाराष्ट्रातील पहिलाच प्रयत्न
शिवा पोळी-भाजी सेंटरमध्ये दररोज दोनशेहून अधिक पुरणपोळ्या बनविल्या जातात. सोन्याचा वर्ख लावलेली एक पुरणपोळी पनवेलमधील शिवा विश्वनाथ महादेव पावन मंदिरात अर्पण करण्यात आली. दुसरी पोळी त्यांचे मित्र डॉ. वाय. सोनटक्के त्यांना दिली. संपूर्ण महाराष्ट्रात ही अशी पहिली पुरणपोळी आहे, असा दावा नारायण कंकणवाडी यांनी केला आहे.