गोंदाव आदिवासींची पाली तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:04 PM2019-09-26T23:04:16+5:302019-09-26T23:04:28+5:30
निवडणुकीवर बहिष्काराचा निर्धार; विविध मागण्यांसाठी मोर्चा
पाली : सुधागड तालुक्यातील गोंदाव आदिवासीवाडीतील ग्रामस्थ विविध प्रश्न व समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. मागील अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. वर्षानुवर्षे मागणी करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध शासन योजनांपासून वंचित राहावे लागल्याने आदिवासी समाज बांधवांच्या प्रगती व विकासाला खीळ बसली आहे. अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटला व दाखल्यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी बुधवारी पाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला व प्रशासनाविरोधातील आपला संताप व्यक्त केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा एकमुखी निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
गोंदाव आदिवासीवाडीतील आदिवासी बांधवांना स्वातंत्र्याच्या ६७ वर्षाचा काळ उलटूनही मूलभूत व पायाभूत नागरी सेवा सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. शासन योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दाखल्यापासून आदिवासी समाज बांधव मागील अनेक वर्षांपासून वंचित राहिले आहेत. परिणामी, आदिवासी कातकरी समाजाला उत्कर्षासाठी असलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्या असल्याचा संताप उपस्थित आदिवासी कातकरी समाज बांधवांनी व्यक्त केला.
लय भारी आदिवासी सामाजिक विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा लता कळंबे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. लता कळंबे यांनी सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधव आजही मूलभूत सुविधा व शासनाच्या महत्त्वाच्या योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. आवश्यक दाखले नसल्याने त्यांना मोठ्या अडचणी व समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आदिवासी समाज बांधवांचा सर्वांगीण विकास साधला जावा या दृष्टीने शासन योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. गोंदावसह अन्य आदिवासीवाड्या-पाड्यातील नागरिकांना लवकरात लवकर मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला.
तसेच आदिवासी कातकरी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांची व्यथा मांडताना दऱ्याखोºयात रानावनात वसलेला समाजबांधव देशाला स्वातंत्र्य मिळूनही अजूनही पारतंत्र्यात जगत आहे. विकासाचा स्रोत वाड्या-वस्त्यात पोहोचत नाही. कष्टप्रद व हलाखीचे जीवन त्यांच्या वाट्याला आले आहे. जीवन-मरणासाठी संघर्ष करीत आहे असे म्हटले. या वेळी मोर्चात सहभागी झालेल्या महिला, पुरुष व विद्यार्थ्यांनी पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्यासमोर गाºहाणे मांडले. या वेळी हाडक्या वाघमारे, श्रावण वाघमारे, कुशा वाघमारे, सुरेश वाघमारे, धाकी वाघमारे, बेबी वाघमारे, मंदा वाघमारे, कुसुम वाघमारे आदीसह आदिवासी कातकरी समाज बांधव उपस्थित होते.
प्रश्न सोडवण्यासाठी ५ नोव्हेंबरला बैठक
या वेळी तहसीलदार रायन्नावार यांनी आदिवासी समाज बांधवांच्या समस्या समजावून घेत आचारसंहिता असून निवडणुकीची तयारी सुरू आहे. मात्र, ५ नोव्हेंबर रोजी गोंदाव आदिवासीवाडीवर सर्व शासकीय प्रमुख अधिकारी यांच्यासमवेत बैठक लावली जाईल व आदिवासी बांधवांचे प्रश्न व समस्यांची सोडवणूक केली जाईल, असे आश्वासित केले.