पाच मिनिटांतच मदतीला हजर; डायल ११२ मुळे वर्षभरात दहा हजार नागरिकांना तत्काळ सेवा

By निखिल म्हात्रे | Published: January 5, 2024 05:25 PM2024-01-05T17:25:12+5:302024-01-05T17:25:42+5:30

अनुचित प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने ११२ ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.

Good intiative of help within five minutes dial 112 provides instant service to 10,000 citizens a year in raigad | पाच मिनिटांतच मदतीला हजर; डायल ११२ मुळे वर्षभरात दहा हजार नागरिकांना तत्काळ सेवा

पाच मिनिटांतच मदतीला हजर; डायल ११२ मुळे वर्षभरात दहा हजार नागरिकांना तत्काळ सेवा

निखिल म्हात्रे,अलिबाग : स्वत:वर होत असलेला अन्याय, सभोवताली घडत असलेल्या अनुचित प्रकारांची माहिती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने ११२ ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. यावर संपर्क केल्यास दहाव्या मिनिटाला पोलिस घटनास्थळी हजर होतील असे सांगण्यात आले आहे. रायगडमध्ये ही सेवा उपयोगी पडत असल्याचे दिसत आहे. वर्षभरात १० हजार ३६१ जणांनी या हेल्पलाईनवर संपर्क केला असून पोलिसांकडून त्यांना तत्काळ मदत मिळाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मित्रांमधील भांडणे, एखाद्या ठिकाणी लागलेली आग, कौटुंबिक कलहातून मारहाण, रात्रीच्या वेळी रस्ता चुकला.. आदी प्रकराच्या तक्रारी या हेल्पलाईनवर येत आहेत. तर अवघ्या पाच मिनिटात त्यांना मदत दिली जाते, असा दावा रायगड पोलिसांनी केला आहे.
जिल्ह्यात एकूण २७ पोलिस स्टेशन आहेत. या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास आता ११२ हा हेल्पलाईन संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मदतीसाठीचा फोन येताच काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना समजल्याने तेथील पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाचवेळी त्या कॉलची माहिती दिली जात आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होतात.


काॅलचे लोकेशन कळते तत्काळ :

११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तक्रारदाराचे लोकेशन लगेच कळते. विशेष यंत्रणेच्या मदतीने व वाहनांवरील जीपीएसच्या साहाय्याने काॅल नेमका कोठून आला, याचे लोकेशन कळविण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धारीत वेळेपेक्षा लवकर मदत मिळत आहे.

कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण :

जिल्ह्याचे ‘जिओ टॅगिंग’ झाले असून ते ‘सेंट्रलाईज कंट्रोल रूम’ला फोन आल्यावर कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा, स्थानिक कंट्रोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया राबवायची, याबाबतची प्रशिक्षण प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

डायल ११२ या नव्या प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. नागरिकांना तत्काळ मदत पोहोचत असल्याने पोलिसांची प्रतिमा देखील उंचावत आहे. मागील वर्षभरात १० हजार ३६१ नागरिकांपर्यंत अवघ्या पाच मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पीडितांच्या समस्या सोडविल्या आहेत. तसेच एखाद्या तक्रारदाराचे निरसन होईपर्यंत पोलिस घटनास्थळी थांबून त्यांना मदत केली आहे.
- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

Web Title: Good intiative of help within five minutes dial 112 provides instant service to 10,000 citizens a year in raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.