मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील दोन लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण मंगळवारी (१८) पहाटेच्या सुमारास ओव्हर फ्लो होऊन वाहु लागले आहे.मागील काही दिवसांपासून कोसळणारे आणि डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहु लागले आहे. मागील वर्षीही १८ जुलै रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती उरण एमआयडीसीच्या कार्यालयातुन देण्यात आली.
उरण तालुक्यातील २५ गावे,उरण शहर आणि काही औद्योगिक विभागासह सुमारे दोन लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. जून महिना जवळपास पुरता कोरडाच गेला होता.पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासुनच धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळी सातत्याने वाढत चालली होती. त्यातच डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे मंगळवारी (१८) पहाटे ४ वाजल्यापासून धरण दुथडी भरून वाहत आहे.त्यामुळे उरणकरांची पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे.