कोरोना नियंत्रणासाठी शासन, प्रशासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:25 PM2020-09-24T23:25:08+5:302020-09-24T23:25:14+5:30

प्रवीण दरेकर यांचा आरोप : महाडमधील एमएमए कोरोना सेंटरची पाहणी करुन घेतली पत्रकार परिषद

Governance for corona control, administration fails | कोरोना नियंत्रणासाठी शासन, प्रशासन अपयशी

कोरोना नियंत्रणासाठी शासन, प्रशासन अपयशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : कोरोना नियंत्रणाच्या कामामध्ये सरकारच्या कथनी आणि करनीमध्ये फरक आहे. कोणत्याही यंत्रणा परस्पर समन्वयाने काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती खालावत चालली आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्याबाबत शासन आणि प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

आ. प्रवीण दरेकर यांनी महाड औद्योगिक वसाहतीमधील एमएमए कोरोना सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. महाड, उत्पादक संघटनेचे (एम.एम.ए.) अध्यक्ष संभाजी पाठारे यांनी या सेंटरची माहिती त्यांना दिली. या वेळेस भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर आणि महाड येथील मनोज खांबे यांनी या कोरोना सेंटरच्या कामाबाबत अनेक तक्रारी केल्या. बिपीन म्हामुणकर यांनी या कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविणारे रॅकेट कार्यरत असल्याचा थेट आरोप केला.


या कोरोना सेंटरची पाहणी केल्यानंतर, महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या रॅकेटसंदर्भात दरेकर यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रकाराची चौकशी करण्यास आपण सरकारला भाग पाडू, असे त्यांनी सांगितले. मात्र त्याच वेळेस शासनाने आश्वासन देऊनही या कोरोना केअर सेंटरला कोणतीही मदत न केल्याने हे सेंटर चालविताना एमएमएची दमछाक होत असल्याचा दावादेखील दरेकर यांनी केला.


रायगड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहोत, त्याचप्रमाणे आपत्ती निवारण योजनेतून महाड येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी ८४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आपत्ती निवारण आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. कोरोना सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स नेमण्यात यावेत यासाठी आरोग्यमंत्र्यांशी आपण चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. या वेळेस भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रहिवाशांना भाड्याची
घरे उपलब्ध करून द्या

तारिक गार्डन इमारतीमधील रहिवाशांचे सध्या हॉलमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याऐवजी शासनाने त्यांना भाड्याची घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेले असंख्य वादळग्रस्त आजही नुकसानभरपाईपासून वंचित असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

Web Title: Governance for corona control, administration fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.