दासगाव : महाड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वारा आणि गारांच्या पावसाने अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे झाले असले, तरी शासकीय नियम आणि निकष या नुकसानभरपाईत अडसर ठरणार आहेत. शासनाने वास्तवता लक्षात घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.महाड तालुक्यात सोमवारी दुपारी काही भागात वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाला. यामध्ये तालुक्यातील पाचाड आणि परिसरात मोठे नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील जवळपास १९ गावांना वादळाचा फटका बसल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आले होते. मात्र, त्यानंतर गावागावांतून नुकसान झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ देत असून, त्याप्रमाणे पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार तालुक्यात १३९ घरे, पुनाडे २५, निजामपूर ३५, रायगडवाडी ५३, वाघोली ३, सांदोशी १५, नाते २, पारवाडी २२, किंजलोली बु. १, किंजलोली खु. १, मांडले १, कोंझर २ असे नुकसान पंचनामे झाले आहेत. काही गावांचे पंचनामे अद्याप सुरू असल्याची माहिती महाड महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांना नुकसानभरपाई मिळावी, अशी आशा असली तरी शासकीय नियम आणि निकष या मदतीला अडसर ठरत आहे.शासकीय नियमानुसार २४ तासांत किमान ६४ मि. मी. पाऊस पडणे गरजेचे आहे. कोकणात नुकसान झाल्यास कोकणातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली जात नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही शेतकरी अगर ग्रामस्थांच्या नुकसानीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासकीय पंचनामे पाहून मदत मिळावी, अशी मागणी अख्तर शेख ग्रामस्थ पाचाड यांनी केली.महाड तालुक्यात आलेल्या वादळी वाºयाने नुकसान झाले हे वास्तव आहे. मात्र, शासकीय निकषात ही मदत बसत नसली, तरी नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदत मिळावी, याकरिता आम्ही झालेले पंचनामे प्रस्तावासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून देत आहोत.- चंद्रसेन पवार,तहसीलदार, महाड
शासकीय निकष नुकसानभरपाईत अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:27 AM