बांगलादेशी महिलेकडे शासकीय कागदपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:36 AM2019-12-24T02:36:03+5:302019-12-24T02:36:17+5:30
स्थानिक पदाधिकाऱ्यांची मदत : शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, जन्म दाखला
मयूर तांबडे
पनवेल : नवीन पनवेल येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाºया सोनाली अब्दुल खुददुस खान (२७) या महिलेकडे खांदेश्वर पोलिसांना शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, जन्माचा दाखला, रेशन कार्ड ही बनावट शासकीय कागदपत्रे आढळून आली आहेत. महिलेला एका राजकीय पदाधिकाºयाने मदत केल्याचे तपासात समोर आले आहे.
खांदेश्वर पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी नवीन पनवेल सेक्टर ६ येथून सोनाली खान या बांगलादेशी महिलेला अटक केली होती. गेल्या १० वर्षांपासून ती भारतात बेकायदेशीरपणे राहत आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला व तिला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिच्याकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, जन्माचा दाखला, रेशन कार्ड सापडून आलेली आहेत. ही सर्व कागदपत्रे बीड येथील आहेत. या सर्व कागदपत्रांची पोलिसांनी पडताळणी केली व ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिलेला एका पक्षाच्या पदाधिकाºयाने मदत केली असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्याच्यावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. सध्या या बांगलादेशी महिलेची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली आहे.
यानिमित्ताने पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिला व पुरुषांना भारतीय नागरिकच आसरा देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते बनावट कागदपत्र बनवून परिसरात राहू लागले आहेत.
यापूर्वीही आढळली होती कागदपत्रे
यापूर्वी चिखले येथे राहणारा इनामुल मुल्ला यांच्याकडेदेखील बोगस नावाने शासकीय कागदपत्रे सापडून आली होती. त्यामुळे बांगलादेशी नागरिकांकडे बोगस प्रमाणपत्रे सापडून येत असल्याने सामान्य नागरिकाने त्यांना ओळखायचे कसे, हा प्रश्न उभा राहिला आहे.