शासकीय वसतीगृहांना व निवासी शाळेला मिळेनात विद्यार्थी
By निखिल म्हात्रे | Published: January 7, 2024 08:03 PM2024-01-07T20:03:16+5:302024-01-07T20:03:30+5:30
शासकीय वसतीगृह व निवासी शाळा प्रवेश क्षमता ७८०, विद्यार्थ्यांचे प्रवेश ३५६.
अलिबाग - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींसाठी रायगड जिल्ह्यात सात शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतीगृहांची विद्यार्थी प्रवेश क्षमता ५८० आहे. मात्र सध्या या सात वसतीगृहांमध्ये सन २०२३/२४ या वर्षात फक्त ३०१ विद्यार्थी असून, २७९ जागा रिक्त आहेत. तर एक शासकीय निवासी शाळेची क्षमता २०० असताना तेथे फक्त ५५ प्रवेश झाले आहेत. २०१८ मध्ये एका शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या जागांवर अन्य मार्गासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंद करण्यात आले, त्यामुळे शासकीय वसतीगृहातील प्रवेश कमी झाले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत.आठवीपासून पुढे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गातील तसेच अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश दिला जातो. वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नाष्टा-भोजन, शैक्षणिक साहित्य, गणवेश, प्रकल्प, कार्यशाळा, इतर शैक्षणिक साहित्य आणि उपक्रमासाठी भत्ता दिला जातो. क्रीडा साहित्य विभागामार्फत देण्यात येते. तर वसतीगृहात दूरसंचार संच संगणक इंटरनेट, अवांतर वाचनासाठी पुस्तके आदी सुविधा देण्यात येतात.
रायगड जिल्हयात सामाजिक न्याय विभागाच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुले व मुलींसाठी एकूण सात शासकीय वसतीगृहे तर मुलांकरिता एक शासकीय निवासी शाळा आहे. अलिबागमधील मुलांच्या शासकीय वसतीगृहाची क्षमता ७५ आहे. मात्र यावर्षी म्हणजेच सन २०२३/२४ वर्षात फक्त २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. तर अलिबागमध्येच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ठया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह असून, त्याची क्षमता ८० असताना यावर्षी फक्त १९ प्रवेश झाले आहेत. तळा तालुक्यात मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाची क्षमता १०० असून, तेथे फक्त २६ प्रवेश झाले आहेत. महाडमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाची क्षमता १०० असून तेथे ९७ तर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाची ७५ क्षमता असताना तेथे ५२ प्रवेश झाले आहेत. पनवेलमध्ये मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाची क्षमता ७५ असून तेथे ५२ विद्यार्थांनी प्रवेश घेतला आहे. सुधागडमधील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ठया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाची क्षमता ७५ असून तेथे फक्त २१ प्रवेश झाले आहेत. अशा प्रकार या सात शासकीय वसतीगृहांची विद्यार्थी क्षमता ५८० आहे. मात्र सध्या तेथे ३०१ विद्यार्थांनी प्रवेश घेतला असून २७९ जागा रिक्त आहेत. तर माणगाव तालुक्यातील जावळी येथे अनुसूचित जाती, नवबाैद्ध मुलांकरिता शासकीय निवासी शाळा असून या शाळेची क्षमता २०० असताना सध्या तेथे ५५ प्रवेश झाले आहेत.
शासकीय वसतीगृहात अनुसूचित जातीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८० टक्के जागा आरक्षित असतात. तर उर्वरित जागा या अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी असतात. संपूर्ण कोकणात अनुसूचित जातीच्या लोकसंख्या फक्त सुमारे ५ ते ६ टक्के आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्याही कमी असते. २०१८ पूर्वी अनुसूचित जातीचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास रिक्त जागांवर अन्य मागास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. मात्र २०१८ मध्ये शासनाने एक शासन निर्णय काढून अनुसूचित जाती आरक्षित जागांवर अन्य मागास वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असे निर्देशित केले आहे.