महिलांच्या संरक्षणाबाबत सरकार उदासीन, महाडमध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांचा घणाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 11:22 AM2021-12-31T11:22:22+5:302021-12-31T11:22:59+5:30
Chitra Wagh : महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष केले. तसेच राज्यात अशा प्रकरच्या घटना घडू नयेत म्हणून सरकार सक्रिय कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाड : आदिस्ते गावातील महिला सरपंचाच्या हत्येच्या घटनेनंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी आदिस्ते गावाला भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, रायगड पोलिसांनी काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पण राज्य सरकार महिला संरक्षणाबाबत मात्र गंभीर नसल्याची टीका त्यांनी केला आहे.
महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष केले. तसेच राज्यात अशा प्रकरच्या घटना घडू नयेत म्हणून सरकार सक्रिय कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाड तालुक्यातील आदिस्ते येथील महिला सरपंच मीनाक्षी खिडबिडे यांच्या हत्येच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांनी आदिस्ते येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी घटनेत आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गुन्हेगारांना पोलीस, कायद्याचे भय नाही
या सरकारच्या काळात गुन्हेगारांना पोलीस आणि कायद्याचे भय राहिले नाही, त्यामुळेच महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातून २५ हजार महिला गायब असल्याचे गृहमंत्र्यांनीच कबूल केले आहे. तसेच राज्यात फास्ट्रॅक कोर्ट नसल्याने महिलांना न्याय मिळत नाही.
- चित्रा वाघ,
प्रदेशाध्यक्ष,
भाजप महिला आघाडी