ऑनलाइन शिक्षणासाठी शासनाचा श्रीगणेशा; शिक्षकांना गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:32 AM2020-07-13T00:32:58+5:302020-07-13T00:33:30+5:30

गुगल केवळ गुगल क्लासरूम हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे. शिक्षक, विद्यार्थी यांचा डेटा शिक्षण विभागाकडे राहणार आहे.

Government launch for online education; Google classroom training for teachers | ऑनलाइन शिक्षणासाठी शासनाचा श्रीगणेशा; शिक्षकांना गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण

ऑनलाइन शिक्षणासाठी शासनाचा श्रीगणेशा; शिक्षकांना गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण

Next

- निखिल म्हात्रे

अलिबाग : राज्यातील शिक्षणाला कोरोना महामारीमुळे खीळ बसली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत. शासनाने इयत्ता वर्गवारीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शाळा सुरू होतील, असे स्पष्ट संकेत सद्यस्थितीत दिसत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये असणारी रुची कायम राहावी, यासाठी शासनाने आॅनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा केला आहे. आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी शासन गुगलचा आधार घेणार आहे. यासाठी गुगल क्लासरूमचे आॅनलाइन प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ४० हजार शिक्षकांना प्रशिक्षित करून उर्वरित शिक्षकांना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी प्रथम शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्या, तरी मुलांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.
सद्यस्थितीत शिक्षक आणि विद्यार्थी यांचा तंत्रज्ञानाच्या मदतीने संवाद साधता यावा, यासाठी आॅनलाइनची मात्रा वापरण्यात आली आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासास देता यावे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे, विद्यार्थ्याला शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाच्या, सूचनांचा त्यांना लाभ घेता यावा, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी गुगल क्लासरूम ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रत्येक शिक्षकास, विद्यार्थ्यास शाळेसाठी जी सूट आयडी तयार करून देण्यात येणार आहे. याच्या साहाय्याने एका वेळी २५० विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन तासिका घेता येणार आहेत, या रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना कधीही पहाता येऊ शकणार आहेत. शिक्षकांसाठी अनलिमिटेड स्टोरेजचे जी सूट आयडी व विद्यार्थ्यांसाठी कमाल मर्यादा असणारे जी सूट आयडी, पासवर्ड देण्यात येणार आहेत. गुगल केवळ गुगल क्लासरूम हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे. शिक्षक, विद्यार्थी यांचा डेटा शिक्षण विभागाकडे राहणार आहे.

नाव नोंदणीसाठी लिंक
गुगल क्लासरूमच्या प्रशिक्षणासाठी प्राधान्याने पहिल्या टप्प्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील ज्या शिक्षकांकडे इंटरनेट सुविधेसह डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप अथवा फक्त प्रशिक्षण कालावधीपुरते ज्यांना इंटरनेट सुविधेसह दोन स्मार्ट फोन उपलब्ध होऊ शकतील, अशा शिक्षकांनी ँ३३स्र://ॅङ्मङ्मॅ’ी.ं्रििल्लॅ्िरेील्ल२्रङ्मल्ल२.्रल्ल/ऌङ्मेी.ं२स्र७ या लिंकवर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने केले आहे. हे प्रशिक्षण ३ तासांचे असणार आहे. नाव नोंदणी केल्यानंतर संबंधित शिक्षकास प्रशिक्षणाच्या मार्गदर्शक सूचना, एसएमएसद्वारे देण्यात येणार आहेत.

राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध होणार असली, तरी पहिल्या टप्प्यात राज्य स्तरावरूनच शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील शिक्षकांसाठी गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण आॅनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात खासगी अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, खासगी विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यामधील शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. - दिनकर पाटील, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

Web Title: Government launch for online education; Google classroom training for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड