अपघातानंतर पहिले तीन दिवस सरकारने उपचार करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 05:58 AM2018-04-27T05:58:16+5:302018-04-27T05:58:16+5:30
त्यामुळे मैत्रिणीने आपल्या मित्राला गाडी हळू चालविण्याचा सल्ला द्यावा.
विजय मांडे ।
कर्जत : वाहने चालविताना ती वेगाने चालवू नयेत. मात्र, मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कॉलेज तरुण वेगाने बाईक चालवितात आणि अपघात होतात. कॉलेज तरुणांना मैत्रीण आणि बाईक अधिक प्रिय असते, त्यामुळे मैत्रिणीने आपल्या मित्राला गाडी हळू चालविण्याचा सल्ला द्यावा. अपघात घडल्यानंतर जखमीवर पहिले तीन दिवस सरकारने उपचार करावेत. काही राज्यात ती पद्धत सुरू आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आरोग्य योजना जाहीर केली होती. मात्र, आजपर्यंत ही योजना कागदावरच असून सरकारने तो खर्च उचलावा, त्यासाठी सरकारला ५० पैशांच्या पोस्ट पाकिटावर लिहून मुख्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे यांना जाब विचारला पाहिजे, असे परखड प्रतिपादन रस्ते वाहतूक या विषयातील तज्ज्ञ विनय मोरे यांनी केले.
कर्जत येथील श्री समर्थ मोटार ट्रेनिंग स्कूल आणि विभागीय वाहतूक नियंत्रक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयात रस्ते वाहतूक याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे आठवे शिबिर आयोजित करण्यात आले असून, या वेळी फार्मसी विभागातील १५० विद्यार्थी यांनी रस्ते वाहतूक आणि सुरक्षितता या विषयावर आयोजित शिबिरात सहभाग घेतला. त्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय परिवहन अधिकारी नीलेश घोटे, रस्ते वाहतूक अभ्यासक विनय मोरे, प्रसिद्ध जादुगार सतीश देशमुख, कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय मांडे, सतीश पिंपरे, फार्मसी विभागाचे प्राचार्य काळे, श्री समर्थ मोटार ट्रेनिंग स्कूलचे अभिजित मराठे, नीलेश मराठे आदी प्रमुख उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांना जादुगार सतीश देशमुख यांनी काही जादूचे खेळ दाखवून वाहतुकीचे नियम यांची माहिती दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने राज्यात वाहतूक नियम सांगण्यासाठी महाविद्यालय येथे जाऊन मार्गदर्शन करणारे आणि वाहतूक नियम बनविण्यास भाग पाडणारे अभ्यासक विनय मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना मोरे यांनी प्रामुख्याने विद्यार्थ्यांशी संबंधित वाहतूक नियम याबाबत मार्गदर्शन केले. त्यात वाहतूक नियम बनविण्यासाठी आम्ही शासनाला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सूचना करीत आहोत. या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील तशा सूचना केल्यास त्यांचा आदर केला जाईल, असे मोरे यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना सल्ला देताना त्यांनी धूम स्टाइलने गाडी चालविणे सोडून दिल्यास अपघात कमी होतील, असे सूचित करताना मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी धूम स्टाइलने गाडी चालवत असाल, तर त्या मैत्रिणीने आपल्या मित्राचे पाय तुटलेले पाहायचे आहे काय? असा सवाल उपस्थित केला. या वेळी त्यांनी शासनाच्या, ‘हात दाखवा गाडी थांबवा’ या संकल्पनेवर नाराजी व्यक्त केली. एसटी, खासगी बस, रिक्षा, प्रवासी वाहन यांनी आपण कुठे थांबणार आहोत, याची माहिती पाठीमागील बाजूस लावावी, अशी मागणी केली.