नवी मुंबई : महागाई कमी करू, महिलांना सुरक्षा देऊ, रोजगारनिर्मिती, बेरोजगारी कमी करू आदी मुद्दे या सरकारने निवडणूक काळात मांडून जनतेसमोर एक वेगळे चित्र निर्माण केले होते. गोरगरिबांच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप या सरकारने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे रविवारी नवी मुंबई जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.हे सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून पाटीभर काम केल्याचे सांगत आहेत; परंतु या सरकारचे वाटीभरही काम झाले नसल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारने दिलेल्या आश्वासनांची सत्यता नागरिकांच्या लक्षात येऊ लागली असून, सरकारने फसवणूक केल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या दिवसांत याचे उत्तर जनता राज्य सरकारला दिल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत फिरत असताना कर्जमाफी मिळालेले शेतकरी आढळले नसून, शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे त्या या वेळी म्हणाल्या. या मेळाव्याला माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार आदी उपस्थित होते.खोटे बोलणे या सरकारचा धंदाया सरकारने आमच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचे सरकार आहे. जे आरोप केले त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही ही वस्तुस्थिती असून, खोटे बोला; पण रेटून बोला, हा या सरकारचा धंदा असल्याचा आरोप वाघ यांनी केला.
सरकारने गरिबांच्या तोंडचा घास पळवला; चित्रा वाघ यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:31 PM