आविष्कार देसाई, अलिबागअवघे २२ वर्षांचे कोवळे वय, जिगर मात्र भारतमातेच्या सुपुत्रासारखीच...१ आॅगस्ट १९९८ साली जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला सीमेवर रक्षणासाठी तो तैनात होता... त्याचवेळी सीमेपलीकडून पाक सैनिकांचा बेछूट गोळीबार सुुरू होतो आणि प्रत्युत्तर करीत असतानाच शत्रूच्या बंदुकीची गोळी त्याचा काळजाचा ठाव घेते... तो धारातीर्थी पडतो... भारतमाता की जय....असे स्वर आळवतो आणि गतप्राण होतो. ही कहाणी आहे अलिबागचा सुपुत्र नीलेश नारायण तुणतुणे याची.नीलेशच्या परिवाराला सरकारने जमीन देण्याचे कबूल केले होते, मात्र १७ वर्षांनंतर आजही हा हुतात्मा सरकार दरबारी उपेक्षितच राहिला आहे. नीलेशचे वडील नारायण रामभाऊ तुणतुणे यांना तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जमिनीचा तुकडा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नारायण तुणतुणे यांनी १६ जून १९९८ साली कागदी सोपस्कार पूर्णही केले. अलिबाग तालुक्यातील मौजे भादाणे येथील जमिनीचा तुकडा लागवडीसाठी द्यावा, अशी मागणी तुणतुणे यांनी केली आहे. देशपांडे यांनी जलदगतीने तुणतुणे यांची फाईल मार्गी लावण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यांची बदली झाल्यानंतर येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही तुणतुणे यांचे काम लवकर व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. ही फाईल सरकार दरबारी मंजुरीसाठी गेली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. तब्बल १७ वर्षे झाली आहेत, तरी अद्याप जमिनीचा तुकडा देण्यात प्रशासन अथवा सरकार यशस्वी झालेले नाही. याचे नेमके कारण काय? असा प्रशन आहे.ज्याने देशासाठी रक्त सांडले आपल्या प्राणाचे बलिदान दिले याचे सोयरसुतक सरकारला नाही. खरेच प्रशासनाला आणि सरकारला नीलेशच्या बलिदानाची कदर असती, तर आज नीलेशच्या वडिलांनी मागणी केलेल्या जमिनीचा तुकडा त्यांना कधीच बहाल केला असता. आमचे प्रकरण सरकार दरबारी पोचले असेल, तर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे, आम्ही त्यांच्याकडे काही मागितले नव्हते, त्यांनीच जमीन देतो असे सांगितले होते. आम्हीही पाठपुरावा करतो आहोत मात्र यश आलेले नाही, अशी खंत नीलेशचे वडील नारायण तुणतुणे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.दरम्यान, १ आॅगस्ट हा नीलेशचा शहीद दिवस आहे. खानाव ग्रामपंचायत हद्दीत उभारलेल्या नीलेशच्या पुतळ््याला श्रध्दांजली वाहण्यासाठी राजकारणी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येतील आणि निघूनही जातील. तेवढ्याने प्रश्न सुटणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन नीलेशच्या परिवाराला न्याय देणे हीच खरी नीलेशला श्रध्दांजली ठरेल.
सरकार दरबारी हुतात्मा उपेक्षितच
By admin | Published: July 12, 2015 10:36 PM