उरण : जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावरील ग्रामस्थ व पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि रखडलेली विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांना दिले. ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी निवेदन दिले आहे.
बेटावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक हजेरी लावतात. मात्र, त्यांना सोयी देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पुरेशी आर्थिक तरतूद नाही. केंद्र सरकारने २०१५ साली कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. या मंजूर निधीप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बेटाच्या विकासासाठी आराखडा तयार केला आहे. मात्र, विकास आराखडाच रखडल्याने पर्यटकांना सोईसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.बेटाच्या चौफेर असलेल्या समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहात येणाऱ्या कचऱ्यामुळे किनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे, तसेच यामुळे बेटावर प्रदूषण वाढीस लागले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी निधी आणि योजनाही उपलब्ध आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. घारापुरी ग्रामस्थ आणि पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची समस्यांवर उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. कारण १,२०० लोकवस्तीच्या बेटावर उपलब्ध असलेल्या एकमेव धरणातूनच राजबंदर, शेेेतबंदर आणि मोराबंदर आदी तीन गावांना आणि पर्यटकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, गळक्या धरणात पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहात नाही. यामुळे पर्यटक आणि ग्रामस्थांना कायम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे अशा अनेक समस्यांविषयी घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे आणि अन्य सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, अनिल देसाई आदी मान्यवरही उपस्थित होते.