सरकार शंभर टक्के पाठिंबा देईल
By Admin | Published: October 28, 2015 12:58 AM2015-10-28T00:58:53+5:302015-10-28T00:58:53+5:30
पेण अर्बन घोटाळ्यातील महाभागाची शंभरी भरण्यास थोडा अवधी आहे. मात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवी हक्काने मिळतील. यासाठी केंद्र व राज्यस्तरावर प्रयत्न सुरू असून
पेण : पेण अर्बन घोटाळ्यातील महाभागाची शंभरी भरण्यास थोडा अवधी आहे. मात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवी हक्काने मिळतील. यासाठी केंद्र व राज्यस्तरावर प्रयत्न सुरू असून पेण अर्बनच्या लढ्याची ऐतिहासिक नोंद होईल. प्रामाणिक कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार ११० टक्के खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पेण अर्बन ठेवीदार समितीच्या सभेप्रसंगी केला.
पेण अर्बन ठेवीदार संघर्ष समितीच्या लढ्यास पाच वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना आमंत्रित केले होते. राज्यमंत्रीपदाचा दर्जा प्राप्त झालेले चरेगावकर कोणतीही निवडणूक न लढता लाल दिव्याचे धनी ठरले. याचा संदर्भ देत त्यांनी आपले भाषण केले. प्रामाणिक प्रयत्नांना ईश्वर, निसर्ग व सेवाभावी कार्य करणारी माणसे न्याय देतात. पेण अर्बन संघर्षाचा लढा असाच प्रामाणिक आहे. ठेवीदारांच्या हक्काचे पै पै साठी न्यायालय, सरकार त्याचे रक्षण करण्यासाठी पुढे सरसावले आहे. त्यांची पाच वर्षांची संघर्षाची निष्ठा, अथक प्रयास यात आत्मीयता व प्रामाणिकपणा आहे. या गोष्टी ईश्वरी संकेतानुसार न्यायप्रिय असून तुमची पै अन् पै मिळणार सरकार पूर्णपणे गांभीर्याने या प्रश्नाकडे बघत असून लवकरच तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार अशी चरेगावकर यांनी खात्री दिली. पेण अर्बन संघर्ष समितीच्या पाच वर्षांच्या लढ्याची रस्त्यावरची व न्यायालयीन लढ्याचे सिंहावलोकन कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी केले.
व्यासपीठावर सचिव हिमांशू कोठारी, विनीत देव व उपस्थितांमध्ये ठेवीदार बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. (वार्ताहर)