जिल्ह्यात शासकीय कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:15 AM2018-08-08T03:15:25+5:302018-08-08T03:15:26+5:30

Government work jam in the district | जिल्ह्यात शासकीय कामकाज ठप्प

जिल्ह्यात शासकीय कामकाज ठप्प

Next


अलिबाग : सातव्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करावी, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी रायगड जिल्ह्यातील विविध २५ संघटनेतील तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. एकाच वेळी मोठ्या संख्येने संप पुकारण्यात आल्याने सरकारी कार्यालये, जिल्हा परिषदेमधील कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. राजपत्रित अधिकारी महासंघाने संपातून अचानक माघार घेतल्याने ते संपामध्ये सहभागी झाले नाहीत. सरकारने लवकरच निर्णय न घेतल्यास ८ आणि ९ आॅगस्ट रोजी देखील संप सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत.
अलिबाग येथील राज्य सरकारी कर्मचारी संघटना सदन येथून मोर्चाला सुरुवात झाली. अलिबाग शहरातील विविध भागांमध्ये फिरल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. त्यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सरकारविरोधात खदखदत असलेला असंतोष स्पष्टपणे आंदोलकांच्या कृतीतून दिसत होता. जिल्हा कारागृह परिसरात पोलिसांनी आंदोलकांना रोखले. त्यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
सरकारने वेळोवेळी चर्चा करून आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. त्यामुळे आंदोलकांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड राग आहे. आता आरपारची लढाई लढायची तयारी कर्मचाºयांनी केल्याचे समन्वय समितीचे निमंत्रक वि. ह. तेंडुलकर यांनी
सांगितले.
>काळ्या फिती लावून काम सुरू
उरण : शासकीय कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपात येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती कर्मचारी उतरल्याने दोन्ही शासकीय कार्यालयातील कामकाज पुरते ठप्प झाले आहे. उनपच्या कर्मचाºयांनी मात्र संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे.
>सुधागडमध्ये तहसीलवर मोर्चा
राबगाव/पाली : सरकार दरबारी पडून असलेल्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी याकरिता सुधागडातील राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामसेवक संघटित झाले आहेत. आपल्या न्याय हक्कासाठी तीन दिवसांच्या लाक्षणिक संपाची हाक दिली.
मंगळवारी सकाळी ११ वाजता पाली पंचायत समिती येथे जमून पाली तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर तहसीलदार बी.एन.निंबाळकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.त्यामुळे पालिकेच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे उनपचे मुख्याधिकारी ए. एस. तावडे यांनी दिली.
सकाळी संपकरी कर्मचाºयांनी तहसीलवरच मोर्चा काढला. सरकारविरोधात त्यांनी घोषणाबाजीही केली. उरण तहसीलमधील कार्यालयातील सर्वच कामगार संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे तहसील संबंधातील सर्वच कामे थंडावली असल्याची माहिती नायब तहसीलदार संदीप खोमोणी यांनी दिली. तर उरण पं. स. चे ७७ पैकी ६८ कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. संपामुळे उरण पं. स.चे कामकाजही ठप्प झाले असल्याची माहिती गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी दिली. दोन्ही कार्यालयाते कर्मचारी फिरकलेच नसल्याने दोन्ही कार्यालयात शुकशुकाटच पसरला होता.
>कर्जतमध्ये कर्मचाºयांची जोरदार घोषणाबाजी
कर्जत : तीन दिवस चालणाºया संपात कर्जत तालुक्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कार्यालय व शाळांमध्ये शुकशुकाट पसरला.
सातवा वेतन आयोग आणि महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. म्हणून पुकारलेल्या संपामध्ये कर्जत तालुक्यातील महसूल कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी,पंचायत समिती कर्मचारी, भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक, नगरपरिषद कर्मचारी, तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी आदी संघटना या तीन दिवसांच्या संपामध्ये सामील झाल्या आहेत. घोषणा देत यांनी मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.
>प्रमुख मागण्या
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी
जुनी पेन्शन योजना लागू करावी
सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी
अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या तातडीने कराव्यात
प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांना किमान वेतन देण्यात यावे
शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण बंद करावे
निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे
पाच दिवसांचा आठवडा करावा आणि खासगीकरण
कंत्राटीकरण बंद करावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस प्रभाकर नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर तर अन्य तालुक्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयावर आंदोलकांनी धडक दिली आहे. संपामध्ये सर्व कर्मचारी सहभागी असल्याने विविध कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. सरकारी कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे संपामुळे चांगलेच हाल झाले.

Web Title: Government work jam in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.