- विनोद भोईरपाली : सुधागड तालुका म्हटले की पालीचा बल्लाळेश्वर, उन्हेरे कुंड, ठानाळेच्या बौद्ध लेणी, सुधागड किल्ला, सरसगड किल्ल्याचे चित्र डोळ्यासमोर येते. सरसगडाविषयी अनेक आख्यायिका पालीकरांनी लहानपणापासून ऐकल्या आहेत. पुरातन, ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या गडाची महसूल दप्तरी डोंगर अशी नोंद आहे. त्याचा सात-बारा वनविभागाच्या नावे आहे. त्यामुळे दुर्गप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.सरसगड पांडवांनी बांधल्याची आख्यायिका आहे. त्याचा पहाडासारखा दिसणारा पुढचा भाग म्हणजे भीम, मग धर्मराज, अर्जुन आणि मग जुळे नकुल आणि सहदेव अशी नैसर्गिक धाटणी असलेला हा किल्ले सरसगड. कदाचित, सुधागडच्या सावलीत वाढल्यामुळे खुजेपण त्याच्यात नैसर्गिकपणे आले असावे.सुधागड किल्ल्याला राजधानी करण्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. मात्र, याच तालुक्यातील सरसगड कायम दुर्लक्षित राहिला.सरसगडाच्या कुशीत बल्लाळने पूजा करून देवत्व प्राप्त केले होते. एका बाजूला अंबानदी आणि एकीकडे तपस्वी सरसगड यांच्या कुशीत पाली गाव वसले आहे. या सरसगडने इतिहासाचे सुवर्णक्षण तसेच स्वराज्याचे पानिपतही पाहिले आहे. याच सरसगडाच्या पायथ्याशी स्वराज्याच्या फितुरांना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली तुडवले होते. अशा अनेक ऐतिहासिक, पौराणिक गोष्टींचा साक्षीदार असलेला सरसगड प्रशासनासह पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित राहिला आहे.सरसगडाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. पाली शहरात उन्हाळ्यात गर्मी झाली की गडाचा कातळ तापतो. त्यामुळे शहरवासी अनेकदा गडावर खापर फोडतात. किल्ल्याच्या पायथ्याशी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे भूस्खलनाची भीती निर्माण झाली आहे.देखरेखीसाठी निधींची तरतूद हवीसरसगड किल्ला सुधागड तालुक्याची ओळख असून पाली शहराची शान आहे, त्यामुळे किल्ल्याची माहिती तसेच किल्ल्यावर जाण्यासाठी वाटांची कोणतीही माहिती तालुक्यात दिसत नाही. सरसगड किल्ल्याची उपेक्षा पुरातत्त्व विभागाकडून झाली असल्यामुळे लवकरात लवकर किल्ल्याची नोंद व्हावी, तसेच किल्ल्याच्या देखभालीसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी दुर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.
सरसगडाची सरकार दप्तरी नोंद ‘डोंगर’ म्हणून, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; दुर्गप्रेमींमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 1:21 AM