पोलादपूर : आजचा दिवस पवित्र आहे. थोर पुरुषांचे महत्त्व माहिती असणे आवश्यक आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन आवश्यक आहे. गडकिल्ल्यांचे रक्षण शिवरायांनी केले ते आपले खरे वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतले तरी चैतन्य येते. शासनाचे धोरण हे पर्यटन विकासाचे आहे. इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. स्वराज्य रक्षणासाठी मूठभर मावळे होते; पण त्यांची मूठ मजबूत होती. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद - रायगड आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समितीच्या वतीने सोमवारी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला, त्या वेळी ते बोलत होते. आयुष्याची राखरांगोळी होईल हे माहीत असूनही आयुष्य पणाला लावणारी तानाजीसारखी माणसे महाराजांनी तयार केली. आयुष्य कसे जगावे हे दाखविण्यासाठी या परिसरामध्ये तुम्ही जे जे मागाल ते ते देईन असे मी वचन देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
माहिती व जनसंपर्क, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी, पोलादपूर तालुका हा दुर्गम तालुका आहे. मात्र तो डोंगराळ म्हणून घोषित व्हावा. सध्या या परिसराला ‘क’ वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त आहे. तो ‘ब’ वर्ग केला जाईल, असे सांगितले. वाढते पर्यटक लक्षात घेता येथे लवकरच बचत भवन उभे केले जाईल. त्यात प्रशिक्षण आणि विक्रीची सुविधा असेल. पाच कोटी रुपये खर्चातून पोलादपूर तालुका क्रीडा संकुल उभे केले जाईल. प्रशासकीय इमारत तालुक्यासाठी लवकरच उभी केली जाईल. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने एक वेगळे वैभव प्राप्त झाले आहे, असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ. भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आस्वाद पाटील आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त सिंहगड ते उमरठ ‘शौर्य यात्रे’चे आयोजन केले होते. या वेळी सिंहगड ते उमरठ शौर्य यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूरचा सत्कार करण्यात आला. तर ‘नरवीर तानाजी’ पुरस्काराने ‘तानाजी’ सिनेमाचे निर्माते ओम राऊत यांना सन्मानित करण्यात आले. अष्टमीनिमित्त नरवीर तानाजी यांच्या पुतळ्यास आप्पा उतेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. दुपारी नरवीर तानाजी मालुसरे सिंहगड ते उमरठ शौर्य यात्रेची भव्य स्वागत मिरवणूक बोरज फाटा ते उमरठदरम्यान काढण्यात आली.