गोविंदा रे गोपाळा!जिल्ह्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:56 AM2018-09-04T01:56:40+5:302018-09-04T01:56:59+5:30
रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी दहीहंडीचा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. तब्बल ७ हजार ३०९ दहीहंड्या परिसरात उभारण्यात आल्या होत्या. विविध सिनेमातील गाणी तसेच पारंपरिक वाद्यांच्या तालावर गोविंदा पथकांनी गोविंदा रे गोपाळा म्हणत ठेका धरला होता.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी दहीहंडीचा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. तब्बल ७ हजार ३०९ दहीहंड्या परिसरात उभारण्यात आल्या होत्या. विविध सिनेमातील गाणी तसेच पारंपरिक वाद्यांच्या तालावर गोविंदा पथकांनी गोविंदा रे गोपाळा म्हणत ठेका धरला होता.
सार्वजनिक मंडळांकडून सोमवारी सकाळपासूनच विविध ठिकाणी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. अलिबाग शहरामध्येही सकाळपासूनच गोविंदा पथकांची धूम अनुभवास आली. न्यायालयाच्या निर्देशानुसार, दहीहंडी उभारण्याच्या उंचीवर असलेले निर्बंध गोविंदा पथकांनी पाळल्याचे दिसून आले.
नाक्यानाक्यावर आणि चौकाचौकामध्ये विविध सामाजिक मंडळांनी दहीहंड्या पुरस्कृत केल्याचे दिसत होते. दुपारनंतर गोविंदा पथकांचे जथ्थेच्या जथ्ये बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने दहीकाला उत्सवाला रंगत आली. गोविंदाच्या पथकांमध्ये मुले-मुली, महिलांचा तर काही पथकांत वृध्दांचाही सहभाग दिसून आला.
पावसाने तुरळक हजेरी लावल्याने गोविंदांचा काहीसा हिरमोड झाला, परंतु तरीही त्यांचा उत्साह कायम होता. पारंपरिक पध्दतीने घराघरात जाऊन पाणी मागून त्यांनी स्वत:ला भिजवून घेतले. काही ठिकाणी पाण्याच्या कृत्रिम फवाºयात बालगोपाळांनी भिजण्याचा आनंद लुटला. दिवसभर जिल्ह्यात असेच चित्र पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे महिला गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या बांधण्यात आल्या होत्या.
शहरी भागात उत्साहाला चांगलेच उधाण आले होते. दहीहंडी पाहण्यासाठी लहान मुले आणि महिलांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागात मात्र गोविंदोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. सनई आणि खालू बाजाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने फेर धरून गोविंदा पथके फिरताना दिसत होती. प्रसाद म्हणून मिळणारे दही, ताक-पोहे यांच्यावर ताव मारत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये यानिमित्ताने भजन, कीर्तन, पूजापाठ असे कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते.
हंडी फोडण्यासाठी महाडमध्ये स्पर्धा
महाड : महाड शहर आणि ग्रामीण भागात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरात शिवाजी चौक मित्र मंडळ आणि आ. भरत गोगावले मित्र मंडळातर्फे उंच हंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. शहरातील नवेनगर, सरेकर आळी,तांबट आळी,कुंभार आळी,गवळ आळी कोटेश्वरी तळे, मुरलीधर आळी आदी ठिकाणी पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला.
श्रीकृष्ण जन्मोत्सवाची म्हसळेत १४५ वर्षांची परंपरा
म्हसळा : श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडी उत्सव संपूर्ण म्हसळा तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. म्हसळा शहरात तीन गोविंदा पथक असून त्यापैकी पेठकर समाज व कुंभार समाज यांचे गोविंदा पथकाने शहरातील बहुतांश दहीहंडी मंडळांत हजेरी लावली, तर कासार व सोनार समाजाचे गोविंदा सोनार आणि तांबट आळी या भागात फिरत होते.
च्शहरात राधाकृष्ण मंदिरात, सोनार-कासार समाज जन्मोत्सव, गणपती मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पेठकर समाजाचा श्रीकृष्ण जन्मोत्सव गेल्या १४५ वर्षांपासून महेंद्र विष्णू ढवळे यांच्या निवासस्थानी परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो. तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
गडब येथे ्रपारंपरिक गोपाळकाला
वडखळ : पेण तालुक्यातील गडब येथे पारंपरिक पध्दतीने गोपाळकाला उत्साहात साजरा आला. पाऊस असल्याने गोविंदांमध्ये उत्साह जाणवत होता. गडब गावात जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे हे पाच पाडे असून प्रत्येक पाड्यात गोपाळकाला पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. या वेळी गोविंदांचे पारंपरिक नृत्य व ढोल-डफलीच्या तालावर गाणी गायली.
दहीकाला उत्साहात
रेवदंडा : चौल-रेवदंडा परिसरात गोकुळ अष्टमीचा सण उत्साहात पार पडला. विविध गोविंद पथकांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंड्या फोडल्या. परिसरात सकाळपासूनच दहीकाल्याची तयारी विविध मंडळाची सुरू होती. विविध मंडळाच्या पथकांनी वाजत-गाजत मिरवणुका काढल्या यात लहानथोरांसह सर्व जण सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी बक्षिसे ठेवण्यात आली होती. गोविंदा रे गोपाळाच्या गजरात दहीहंड्या फोडल्या. पावसाचे सावट असल्याने उत्साह वाढलेला दिसला. पोलीस यंत्रणा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज होती.