अलिबाग - अधिकमासामुळे दहीहंडी उत्सव पुढे आल्याने गोविंदा पथकांना सरावासाठी २०-२५ दिवस अधिकचे मिळाले आहेत. त्यामुळे सरावाची सुरुवात गोविंदा पथकांनी उशिरा सुरू केली होती. तसेच, सध्या सुरू असलेल्या गटातटाच्या राजकारणात न पडता राजकीय जोड़े बाहेर ठेवूनच मैदानात उतरणार असल्याचे गोविंदा पथकांनी सांगितले. त्यामुळे जिथे दहीहंडी उत्सव साजरा होईल, त्या त्या ठिकाणी जाऊन दहीहंडी फोडणार असल्याचे गोविंदा पथकांनी सांगितले.
यावर्षी श्रावण अधिकमास आल्याने १९ दिवस उशिरा सण-उत्सव आले आहेत. ऑगस्ट महिन्यात येणारा दहीहंडी उत्सव हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांना सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी सरावास सुरुवात करणाऱ्या गोविंदा पथकाने या दिवशी सरावाचा नारळ फोडला होता. सरावासाठी अधिकचे दिवस मिळाल्याने जास्तीत जास्त गोविंदा गोळा करता येतील, फिटनेसवर लक्ष देता येईल आणि सराव चांगला करता येईल, असे गोविंदा पथकांनी सांगितले.हंड्या फोडण्यास सज्ज
सध्या दहीहंडी उत्सवात राजकीय पक्षांची चढाओढ असल्याने अनेक छोट्या छोट्या दहीहंड्या बांधणे बंद झाले आहे. तसेच, पैशाची कमतरता यामुळे अनेक छोटे छोटे गोविंदा पथक बंद झाले. या पथकातील इच्छुक गोविदांना आपल्या पथकात सामावून घेण्याचा प्रयत्न मोठ्या गोविंदा पथकांकडून सुरु आहे. गेल्या काही वर्षात राजकीय पक्ष मोठमोठ्या थरांच्या दहीहंड्या आयोजित करीत आहेत. सध्या महाराष्ट्रातील राजकारण गटातटाचे झाले आहे. परंतु, असे असले तरी आम्ही सर्वच पक्षांच्या दहीहंडी फोडण्यास सज्ज आहोत, असे गोविंदा पथकांनी सांगितले.आम्ही मागील एक महिन्यापासून सरावाचा श्री गणेशा केला. राजकीय पक्षांच्या गटातटाचा आमच्यावर परिणाम होणार नाही. आमच्या टी-शर्टवर राजकीय पक्षांचे चिन्ह आम्ही टाकत नाही. दहीहंडी फोडायला येणारा हा केवळ गोविंदा म्हणून सहभागी होतो.- अॅड. योगेश घाडगे, चिद् बा देवी गोविंदा पथक कुरुळ.आमच्या पथकाचा सराव हा गुरुपौर्णिमेपासून सुरु केला आहे. राजकारण बाजुला ठेवूनच पथकात सहभागी व्हायचे, असे आमच्या मंडळाकडून सांगितले जाते. यंदा अधिक मासामुळे आम्हाला २० दिवस जास्तीचे सरावासाठी मिळाले आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहे.- वैभव नेमण, काळभैरेश्वर गोविंदा पथक पवेळे.