जलसाठे निश्चितीसाठी ‘जीपीएस’ होतेय यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:39 AM2019-04-26T00:39:31+5:302019-04-26T00:40:14+5:30

आधुनिक तंत्र : निधीचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न

'GPS' was successful for ensuring water supply | जलसाठे निश्चितीसाठी ‘जीपीएस’ होतेय यशस्वी

जलसाठे निश्चितीसाठी ‘जीपीएस’ होतेय यशस्वी

googlenewsNext

अलिबाग : भूगर्भातील पाणीसाठे शोधण्यात वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक तंत्रज्ञानातून १०० टक्के जलसाठ्यांची निश्चिती होतेच असे नाही. परिणामी, अनेकदा बोअरवेल्स खोदल्यावर निराशा पदरी पडून त्यासाठी करण्यात येणारा खर्चदेखील फुकट जातो. ही समस्या टाळून भूगर्भातील नेमके जलसाठे शोधून काढण्याकरिता एडीसीसी इन्फोकॅड या संस्थेच्या सहयोगाने जीपीएस या आधुनिक तंत्राचा वापर रायगड जिल्हा परिषदेने यंदा प्रथमच केला. त्यास यश मिळत असल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत.

रायगड जिल्ह्यात एकूण ६००३ जलस्रोत नोंदीत आहेत. त्यांच्या स्थान निश्चितीचे काम एडीसीसी इन्फोकॅड या संस्थेच्या सहकार्याने जीपीएसद्वारे जिल्ह्यात करण्यात येत आहे. आता पर्यंत ९ हजार ३१३ पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे मॅपिंग (स्थान निश्चिती) केले आहेत. जिल्हा परिषदेकडे नोंदीत आणि इन्फोकॅडने मॅपिंग केलेले जलस्रोत यांच्यातील समाईक जलस्रोतांच्या निश्चितीचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील जलस्रोतांचा तपशील (डेटा) तयार केला जाणार आहे.

कोणत्याही तालुक्यातील गावात विहीर अथवा कूपनलिका खोदण्याचे प्रस्ताव आल्यावर, सर्वप्रथम तेथे त्यांची गरज आहे का? याची खातरजमा प्राप्त माहितीमधून एका संगणकीय क्लिकवर होणार आहे. संगणकावरील माहितीमध्ये त्या गावांतील भूगर्भामध्ये किती पाणी शिल्लक आहे, तसेच तेथे किती विहिरी अथवा कूपनलिका आहेत, याचीही माहिती त्वरित मिळणार आहे. विहीर अथवा कूपनलिका खोदण्याची मागणी गरजेची नसेल तर तो प्रस्ताव फेटाळण्याबाबतचा निर्णय जिल्हा परिषदेस घेता येणार आहे.

नवीन जीपीएस कार्यप्रणालीमुळे पाण्याचा अपव्य टाळण्याबरोबरच, बंद पडणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतून शासनाचा निधीदेखील वाचू शकणार आहे. या आधुनिक तंत्राचा उपयोग होणार असून वेळ वाचणार आहे.

अधिकारी कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण पूर्ण
जीपीएस मॅपिंगद्वारे जलस्रोत निश्चितीकरण पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील जलसुरक्षारक्षक गट समन्वयक, गट समूहसमन्वयक, पाणी गुणवत्ता सल्लागार, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत समिती विस्तार अधिकारी, ग्रामलेखा समन्वयक, गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभाग गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली आहे.

विविध जलस्रोतांचे प्रकार
हातपंप -१५८५, दुहेरी पंप-९२, सार्वजनिक विहीर-२६२२, खासगी विहीर-२१६, नळ योजना -१०६०, लघु नळ योजना-१४५, प्रादेशिक नळ योजना-२८३

तालुकानिहाय जलस्रोत
तालुका जलस्रोत
अलिबाग ६६१
पेण ४२१
सुधागड ४२९
पनवेल ४६७
उरण १४७
कर्जत ४८९
खालापूर ४१२
रोहा ४१३
मुरुड १४८
माणगाव ५१२
तळा २५९
म्हसळा १३२
श्रीवर्धन ४१३
महाड ८१८
पोलादपूर २८२

Web Title: 'GPS' was successful for ensuring water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी