कर्जत : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच केशरी शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे व जून या महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ लवकरच देण्यात येणार आहे, अशी माहिती कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.एपीएल (केशरी) मधील ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच तालुक्यातील शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नाही अशा एपीएल (केशरी) शिधापत्रिकांची तालुक्यात संख्या १४ हजार ८५० एवढी असून त्या लाभार्थ्यांना सद्य:स्थितीत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत नसल्याने, देशातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना दोन महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत केशरी कार्डधारकांना गहू व तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे.त्यानुसार एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो या दराने प्रतिमाह प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता वितरित करण्यात येणार आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांसाठी मोफत देण्यात येत आहे.>तीस हजार कार्डधारककर्जत तालुक्यात प्राधान्य कार्डधारकांची संख्या ३० हजार १९६ आहे, प्राधान्य कुटुंब- केशरी/पिवळे कार्ड धारकांना गहू ३ किलो प्रति व्यक्ती २ रुपये किलो, तर तांदूळ २ किलो प्रति व्यक्ती ३रुपये किलो.अंत्योदय पिवळे कार्डधारकांची संख्या १० हजार ६६५ आहे. त्यांना गहू २० किलो २ रुपये प्रमाणे तर तांदूळ १५ किलो ३ रुपयेप्रमाणे तर साखर १ किलो मिळणार आहे, अशी माहिती तहसील विभागाने दिली.
केशरी कार्डधारकांना मे, जूनमध्ये सवलतीच्या दरात धान्यवाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 2:14 AM