सुधागडात रास्त भाव धान्य दुकानदार जाणार संपावर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 01:05 AM2020-08-19T01:05:59+5:302020-08-19T01:06:10+5:30
तसेच रेशन दुकानदारांची टेस्ट न केल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
विनोद भोईर
पाली : नाडसूर, जांभूळपाडा येथील रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, जिल्हाधिकाऱ्यांनीही रास्त भाव धान्य दुकानदारांची कोरोना टेस्ट करण्यासाठी आदेश जारी केले होते. मात्र, तहसीलदारांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे सुधागड तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे म्हणणे आहे, तसेच रेशन दुकानदारांची टेस्ट न केल्यास संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
सुधागड तालुक्यातील नाडसूर, जांभूळपाडा येथील रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, तसेच रेशनधारकांना रेशनिंग देताना येणारा नजीकचा थेट संपर्क यातून रेशनिंग दुकानदारांच्या कुटुंबाची कोविडसंदर्भात धास्ती वाढत आहे. रेशनिंग वितरण करताना ई-पास मशीनवर लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे घेताना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी ६ आॅगस्ट रोजी सर्व रेशन दुकानदारांची कोविड अँटिजेन टेस्ट करण्यासंबंधी आदेश जारी केले होते. परंतु सुधागड तालुका तहसीलदार आदेशाला केराची टोपली दाखविली. अद्यापपर्यंत सुधागडात एकाही रेशन दुकानदाराची कोविड टेस्ट तहसीलदार सुधागड यांच्याकडून केली नसल्याने, या सर्व बाबींचा विचार करता, संपावर जाण्याचा निर्णय सुधागड तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने घेऊन, तसे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तहसीलदारांमार्फत देण्यात आले आहे.
।करोना टेस्टची किट उपलब्ध नसल्यामुळे टेस्टला उशीर होत आहे. आतापर्यंत तालुक्यात २५० टेस्ट केल्या आहेत. यामध्ये पोलीस, तहसील, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांतील कर्मचारी व अधिकारी यांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. बुधवार, १९ आॅगस्टपासून रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या कोरोना अँटिजेन टेस्ट करण्यात येतील.
- दिलीप रायन्नवार,
तहसीलदार, पाली, सुधागड