ग्रामपंचायत संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात, सहा ते सात महिने पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 03:08 AM2018-11-04T03:08:22+5:302018-11-04T03:08:45+5:30

संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत.

Gram Panchayat computer operators in the dark in the dark, six to seven months without pay | ग्रामपंचायत संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात, सहा ते सात महिने पगाराविना

ग्रामपंचायत संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात, सहा ते सात महिने पगाराविना

Next

म्हसळा -  संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतींत काम करणारे आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे सुमारे २२ हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत. २०१६ पासून याच संगणक परिचालकांची ‘आपले सरकार सेवा’ केंद्रांतर्गत नव्याने नियुक्ती करून, त्यांना केंद्रचालक हे पद देऊन आॅनलाइन कामे करून घेतली जात आहेत. मात्र, दोन वर्षांपासून परिचालकांवर अन्याय होत आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संगणक परिचालकांना मानधन मिळाले नसल्याने त्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.
एकीकडे, ‘आपले सरकार सेवा’च्या नावाखाली वेगवेगळ्या मार्गाने पैसे उकळण्यात येत असल्याने केंद्र शासनाची सीएससी-एसपीव्ही ही कंपनीच ग्रामपंचायतींच्या पैशांवर डल्ला मारतेय, अशीही परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासनाने सर्व संगणक परिचालकांचे पद निश्चित करून, माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेकडून करण्यात येत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवून शासनाने संगणक परिचालकांना न्याय द्यावा, अशी विनंती राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. संगणक परिचालकांना (केंद्र चालकांना) एकूण रकमेपैकी मानधन म्हणून फक्त ६०००/- प्रतिमाह देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ते देण्यात न आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

वेळेत मानधन न होण्याची काही कारणे आहेत, त्यापैकी हजेरी न लावणे, इन्व्हाइस क्लेम न करणे, अशी काही कारणे आहेत. आता पेमेंट सिस्टीममध्ये बदल करण्यात आला आहे. नुकतेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखाधिकारी यांच्या सहीने सीएससी कंपनीच्या खात्यात एक कोटी २० लाख रु पये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्व संगणक परिचालकांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा होईल.
- जयेश म्हात्रे, जिल्हा व्यवस्थापक, रायगड, आपले सरकार सेवा केंद्र
आपले सरकार सेवा केंद्राच्या नावाखाली सरकार आणि कंपनी अक्षरश: जनतेची फसवणूक करीत आहेत. तर आॅनलाइनची कामे करणारे संगणक परिचालक उपाशी असल्याची परिस्थिती आहे. १४ वा वित्त आयोग निधीतून ‘आपले सरकार सेवा’च्या नावाखाली ग्रामपंचायतीकडून आगाऊ रक्कम घेतली जात आहे, मग या परिचालकांना वेळेत मानधन का मिळत नाही, हा प्रश्न आहे.
- किशोर काजारे, सरपंच,
वळके, ता. मुरु ड
ग्रामपंचायतींचा भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे आणि त्या बदल्यात कंपनीने ज्या सेवा ग्रामपंचायतीमार्फत गावातील नागरिकांना दिल्या पाहिजेत, त्या सेवा प्रकल्प सुरू होऊन दोन वर्षे होत आली तरी योग्य पद्धतीने सुरू झालेल्या नाहीत, याचा अर्थ शासनाच्या ‘आपले सरकार सेवा’ केंद्र या प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे.
- मयूर कांबळे,
राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्ष

Web Title: Gram Panchayat computer operators in the dark in the dark, six to seven months without pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.