पेणमधील गामपंचायत निवडणुका डिसेंबरअखेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 12:38 AM2020-11-03T00:38:39+5:302020-11-03T00:39:04+5:30
Gram panchayat elections in Pen :येत्या काही दिवसांत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने, या आरक्षणाकडे भावी सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे.
पेण : पेणमधील मुदत संपलेल्या ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. थेट सरपंचपदाच्या निवडणुका रद्द झाल्याने आता सदस्यांच्या मतदानावर सरपंचांची निवड होणार असल्याने, पुन्हा एकदा ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
येत्या काही दिवसांत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने, या आरक्षणाकडे भावी सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचनेनुसार काढण्यात आलेल्या आरक्षणाला अंतिम रूप मिळणार आहे. त्यानुसार, ग्रामपंचायत निवणूक कार्यक्रमाची सुरुवात व रूपरेषा अपेक्षित आहे.
पेणमध्ये वाकरूळ, कामार्ली, आंबेघर, जोहे या मोठ्या ग्रुपग्रामपंचायती असून, यातील तीन ग्रामपंचायतींवर शेकापक्षाचे वर्चस्व असून, आंबेघर व बोर्झे शिवसेनेकडे आहे, तरीही आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप या चार पक्षांत आघाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध सर्व पक्ष असा सामना निवडणुकीत सामना रंगणार आहे.
सहा जागांवर चुरस
सहाही ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर महिन्यात संपलेली असून, या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये ८७ ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या असून, त्याही ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगतदार
ठरणार आहे.