ग्रामपंचायत, शासनाचे टँकर बंद : हंडाभर पाण्यासाठी चिमुरड्यांची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:08 AM2019-06-26T02:08:10+5:302019-06-26T02:08:27+5:30

कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी कोरड्या नदीमध्ये डवरे खोदून पाणी आणावे लागत आहे

Gram panchayat, Government tanker closed: Workout of chimudra for crispy water | ग्रामपंचायत, शासनाचे टँकर बंद : हंडाभर पाण्यासाठी चिमुरड्यांची कसरत

ग्रामपंचायत, शासनाचे टँकर बंद : हंडाभर पाण्यासाठी चिमुरड्यांची कसरत

Next

- कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी कोरड्या नदीमध्ये डवरे खोदून पाणी आणावे लागत आहे. मात्र, ते डवरे देखील आटल्याने त्या नदीत पाच ते सात फुटांचे खड्डे खोदून पाण्याचे थेंब गोळा करावे लागत आहेत. ग्रामपंचायत आणि शासनाने सुरू केलेले टँकर बंद झाले आहेत, त्यामुळे आदिवासींना हंडाभर पाण्यासाठी दिवस घालवावा लागत आहे. जर त्या ठिकाणी नदीमध्ये असलेले सिमेंट बंधारे दुरुस्त केले तर आदिवासी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.

खांडस ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी, पादिरवाडी, पेटारवाडी, घुटेवाडी या ठिकाणी पिण्याचे पाणी मे आणि जून महिन्यात जमिनीत घुसून शोधावे लागते. कारण चाफेवाडीची उपनदी उन्हाळ्यात कोरडी पडते आणि मग डवरे खोदून त्यातून पाणी नेले जाते. त्या त्या वाडीमधील विहिरी जानेवारी महिन्यात कोरड्या पडल्या असून आदिवासी लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी नदीमध्ये डवरे खोदावे लागतात. त्या भागात एक किलोमीटर अंतरात किमान चार ठिकाणी कोल्हापूर टाइपचे सिमेंट बंधारे आहेत. त्यातील दोन बंधारे २०१७ मध्ये ५० लाख रुपये खर्च करून बांधले आहेत. मात्र, नवीन दोन आणि जुने दोन असे सर्व सिमेंट बंधारे हे पाणीगळतीमुळे पाणी साठवण करून ठेवण्यात कुचकामी ठरत आहेत. पाणी जमिनी खालून वाहून जात असल्याने मग जानेवारी उजाडला की पाणी राहत नाही.

मे महिन्यापर्यंत तेथील आदिवासी लोक ज्यांचे वय १५ वर्षांहून अधिक आहे ते कोरड्या नदीमध्ये खोदलेल्या डवऱ्यामधून पाणी नेऊ शकत होते. मात्र, जून महिन्यात नियोजित काळात पाऊस आला नसल्याने डवरे हे खोलवर पाणी शोधण्यासाठी खोदले जात आहेत. त्यामुळे नदीमधील खडक असलेल्या ठिकाणी पाण्याचे झरे आढळून येत असल्याने मग ते पाणी शोधण्यासाठी आदिवासी लोक पाच फूट सहा फूट खोल जातात. त्या वेळी पाणी लागल्यानंतर मग ते पाणी बाहेर काढण्यासाठी आपल्या मुलांना डवºयात उतरवत आहेत. मोठी माणसे वरून निमुळता होत गेलेल्या खड्ड्यात पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे लहान मुलांना म्हणजे साधारण १५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना डवºयात उतरता येऊन पाणी काढता येते. घरातील लहानग्यांना उतरवून त्यांच्या माध्यमातून एक एक वाटी पाणी जमा करून हंडा भरला जातो.

ही कसरत केवळ विद्यार्थी असलेली लहान मुले करू शकत असल्याने त्या सर्व मुलांचे दिवस सध्या शाळेऐवजी कोरड्या नदीवर जमिनीमध्ये घुसून पाणी शोधण्यात जात आहेत. हे पोशीर आणि चिल्लार नदीमध्ये आणि त्यांच्या उपनद्यामध्ये सध्या दिसणारे चित्र आहे. आपल्याला पाणी मिळावे यासाठी अनेक आदिवासी कुटुंबे चाफेवाडीपासून पादीरवाडीपर्यंत नदीपात्रात अखंडपणे दिसणारे चित्र आहे. चार पाच जण ग्रामस्थ मिळून असे खोल खड्डे खोदून पाणी शोधून ठेवतात आणि मग आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी चार चार तास बसून पाणी गोळा करतात.

१कोरड्या नदीमध्ये पालकांच्या मदतीला शाळा चुकवून मुले खोदलेल्या खड्ड्यात उतरलेली दिसतात. हे चित्र बदलण्यासाठी भीमाशंकर येथून पुढे वाहत येणाºया नाणी नदीवर मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याची आणि त्यात पाणी अडविण्याची गरज आहे.

२त्याच वेळी सध्या असलेले जुने बंधारे यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. हे बंधारे पाणी गळती रोखण्यात यशस्वी ठरले तर मग कोरड्या असलेल्या नद्या पुन्हा पाणीदार होऊ शकतात. चाफेवाडी येथे कोरड्या नदीत एक सहा वर्षांची चिमुरडी ज्या वेळी खड्ड्यात उतरली त्या वेळी बाजूने जाणाºया वाटसरूला ती दिसत देखील नव्हती.

३एवढी खोल जाऊन ती आपल्या कुटुंबासाठी पाणी काढत होती. तर सानिका हिंदोळा जी सातवीमध्ये आहे ती देखील आपली आई विमल मुकुंद हिंदोळा यांच्या मदतीला दिवसभर असते. अशी स्थिती कधी दूर होणार? याबाबत समाजदेखील जागरूकपणे शासकीय कामे करून घेण्यासाठी पुढे सरसावला पाहिजे तरच भ्रष्टाचार कमी होऊन शिकण्याचे वयात मुले शाळेत जातील आणि शिक्षण घेतील.

पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी माझ्या लहानशा लेकीला शाळा बुडवावी लागतेय...भर उन्हात रखरखत्या या वातावरणात कोरड्या ठाक पडलेल्या नदीत खोदलेल्या पाच-सहा फू ट खोल खड्ड्यात त्या लहान जीवाला उतरावे लागत आहे...ती दिवसभर वाटी वाटी पाणी गोळा करून आमच्यासाठी हंडाभर पाणी जमा करते...ती जेव्हा पाच फू ट खड्ड्यात उतरते तेव्हा काळीज धस्स होतं; पण आमच्याकडे काही पर्याय नसल्याने माझ्या लेकीकडून ही कसरत करून घ्यावी लागते... अशी व्यथा सानिका हिंदोळा या चिमुरडीची आई विमल हिंदोळा यांनी मांडली.

Web Title: Gram panchayat, Government tanker closed: Workout of chimudra for crispy water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.