कोल्हारे येथील इमारतीवर हातोडा?;अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे ग्रामपंचायतीला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:42 PM2019-12-13T22:42:13+5:302019-12-13T22:43:46+5:30

‘महारेरा’ला तिलांजली

Gram Panchayat orders action on unauthorized construction in kolhare building | कोल्हारे येथील इमारतीवर हातोडा?;अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे ग्रामपंचायतीला आदेश

कोल्हारे येथील इमारतीवर हातोडा?;अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे ग्रामपंचायतीला आदेश

googlenewsNext

नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात मागील काही वर्षांत बिल्डर लॉबीच्या नजरा वळल्याने या परिसरात छोटे-मोठे गृहप्रकल्प साकार होत आहेत. हे गृहप्रकल्प आकार घेत असताना शासकीय परवानग्या आवश्यक आहेत. मात्र, शासनाच्या ‘महारेरा’ सारख्या कायद्याला तिलांजली देत या ठिकाणी अनेक इमारती उभ्या राहत आहेत. अशीच एक इमारत कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत उभी राहिली आहे. अनधिकृत उभ्या राहिलेल्या या इमारतीच्या बांधकामामुळे तक्रारी आल्याने खडबडून जागे होत प्रशासनाने आता त्यावर हातोडा फिरवण्याची तयारी सुरू केली.

मागील काही वर्षांत येथील नेरळ, ममदापूर, कोल्हारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बांधकाम व्यवसायाने भलताच जोर घेतला. त्यामुळे येथील नागरीकीकरण झपाट्याने व्हायला लागले. मात्र, हे होत असताना काही बांधकाम व्यावसायिकांना शासकीय नियमांचा विसर पडला. तेव्हा कोणतीही शासकीय पूर्वपरवानगी न घेता टोलेजंग इमारत उभी राहू लागली. त्यावर कोणी कारवाई करत नसल्याने केवळ ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेत त्यावर इमारत उभारणीचे एक नवे फॅड अस्तित्वात येऊ लागले.

कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील चार फाटा येथे शौकीन नवाब खान यांनी घरदुरुस्तीचा अर्ज देऊन कोल्हारे ग्रामपंचायतीकडे बांधकामास ना हरकत दाखला मिळण्याची विनंती केली. त्यावर ग्रामपंचायतीने मासिक सभेत १९ मार्च २०१९ रोजी ठरावाप्रमाणे दोन गुंठे जागेत तळमजला अधिक दोन मजले बांधण्यास ग्रामपंचायत अधिनियमास अधीन राहून अटीअन्वये ना हरकत दाखला दिला. त्यात बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व विभागांच्या परवानग्या घेऊन सर्व दस्तावेज सादर करण्यास सांगितले होते.

मात्र, विकासकाने कोणतेच कागदपत्र, परवानग्या सादर न करता बिनदिक्कत बांधकाम सुरू ठेवले. सदर इमारतीच्या बाजूने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ता जात आहे. त्यामुळे त्या विभागाची परवानगीही आवश्यक होती. मात्र, तीही न घेता बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम विभागाच्या नियंत्रणरेषेच्या बाहेर बांधकाम केले. त्यामुळे त्यावर सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी आक्षेप घेतल्याने तसेच तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने हे बांधकाम थांबवण्याची नोटीस ग्रामपंचायतीने देऊनही बांधकाम सुरळीत सुरू ठेवण्यात आले होते. तेव्हा प्रशासनाने आता आणखी कठोर होत ग्रामपंचायतीला कारवाईचे आदेश दिले आहेत.
हे बांधकाम कोणत्याही विभागाची परवानगी न घेता केले असल्याने कर्जत पंचायत समितीने कोल्हारे ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत अधिनियमाची आठवण करून देत असे अनधिकृत बांधकाम आपल्या स्तरावर काढून टाकण्याचे अधिकार असल्याचे सांगितले आहे.

तसेच अजूनपर्यंत आपण कारवाई का केली नाही, याबाबतही फटकारले आहे. त्यामुळे कोल्हारे ग्रामपंचायतीला या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवावा लागणार आहे. आतापर्यंत तीन मजल्याचे काम पूर्ण करून चौथ्या मजल्याचे काम त्या इमारतीचे सुरू केले आहे. दरम्यान, या बांधकामावर कारवाईचा हातोडा कोसळताच अनेक अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणणार आहेत.
नेरळ व परिसरात मोठ्या प्रमाणात इमारत बांधकाम सुरू आहे. त्यातील अनेक बांधकामे ही अनधिकृत स्वरूपात सुरू आहेत.

ग्रामपंचायतीच्या ना हरकत दाखल्यावर बांधकाम करणे, परवानगी घेतली असली तरी स्टील्ट असलेल्या भागात दुकानाचे गाळे काढून विकणे, मूळ परवानगी घेतली असली तरी अनेक माजले अनधिकृत वाढवणे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याच्या बाजूला बांधकाम असे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र, प्रशासन त्यावर कारवाई करत नाही ही शोकांतिका आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी आम्ही उपोषणही केले. मात्र, कारवाईचा अद्याप पत्ता नाही. कोल्हारे चारफाटा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई झाल्यास अनेकांसाठी ती चपराक असेल, कारवाई झालीच पाहिजे.
- विजय हजारे,
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Gram Panchayat orders action on unauthorized construction in kolhare building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.