वृक्षलागवडीचा पाभरे ग्रामपंचायतीने उडविला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:46 PM2019-11-17T23:46:47+5:302019-11-17T23:46:50+5:30

ग्रामपंचायतीच्या आवारात सडताहेत रोपे; सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांचे दुर्लक्ष; गटविकास अधिकाऱ्यांकडून कारवाई अपेक्षित

The gram panchayat of the tree planted the fajja | वृक्षलागवडीचा पाभरे ग्रामपंचायतीने उडविला फज्जा

वृक्षलागवडीचा पाभरे ग्रामपंचायतीने उडविला फज्जा

Next

- उदय कळस 

म्हसळा : महाराष्ट्र शासनाने गाजावाजा करून ३३ कोटी वृक्षलागवड ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला काही गावांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी मोहिमेला हरताळ फासण्यात आला असून प्रत्यक्ष झाडे न लावताच खर्च दाखवून मोहीम केवळ कागदावरच पूर्ण करण्यात आली आहे.

म्हसळा तालुक्यातील पाभरे ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या वृक्षलागवड उपक्रमांतर्गत, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यात ताळमेळ नसल्याने सामाजिक वनीकरण विभागाकडून घेतलेली हजारो झाडे ग्रामपंचायतच्या आवारात सुकत पडली आहेत. यामुळे पाभरे ग्रामपंचायतमध्ये वृक्षारोपण संकल्पनेचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे शासन विविध योजनांच्या माध्यमातून वृक्षारोपण करून संवर्धन करण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र, पाभरे ग्रामपंचायतीला वृक्षारोपण करण्याचा विसर पडलेला दिसून येत आहे.

पाभरे ग्रामपंचायतीकडे वृक्षारोपणाबाबत विचारणा केली असता, संबंधित व्यक्ती एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे दिसून आले. जून महिना संपून आज पाच महिने झाले आहेत, तरी अद्यापही झाडे लावली नसल्याने ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा उघड होत आहे. आणलेली रोपे ग्रामपंचायतीच्या आवारातच पडली असली तरी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. आतापर्यंत अनेक ग्रामसभा, मासिक सभा झाल्या. मात्र, वृक्षारोपणाबाबत निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचा ग्रामपंचायत तपासणी दौरा झाला आहे. या अधिकाऱ्यांनीही ग्रामपंचायतीच्या आवारात पडलेल्या रोपांची चौकशी केली नाही.

ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार रोपे पुरविण्याची जबाबदारी आमची होती, ती आम्ही पार पाडली. ही रोपे लावण्याची व त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. या सर्व प्रक्रियेवर गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण आहे. त्यांनी याबाबतीत लक्ष घालून चौकशी करणे अपेक्षित असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाºयांची सांगितले.

पाभरे ग्रामपंचायतीमध्ये झाडे लावली गेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. हजारो रोपे ग्रामपंचायत कार्यालय व शाळेच्या पटांगणात पडून आहेत आणि सुकत चालली आहेत. या सर्व परिस्थितीला सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक जबाबदार असून त्यांच्यामार्फत जनजागृती करणे गरजेचे होते. गतवर्षीही वृक्षारोपणासाठी आणलेली अनेक रोपे सुकून गेली होती. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे शासनाचे लाखो रुपये वाया जात आहेत.
- प्रकाश रायकर, ग्रामस्थ, पाभरे - चाफेवाडी, ग्रामपंचायत

ग्रामपंचायतीमध्ये पुरविण्यात आलेली झाडे कोणत्या निधीतून आणली आहेत, याबाबत कल्पना नाही तसेच ही रोपे लावली गेली नाहीत, ही वस्तुस्थिती खरी आहे.
- जयवंत अवेरे, सदस्य, पाभरे ग्रामपंचायत.

ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये आणलेली रोपे ग्रामस्थांना घेऊन जायला सांगितले होते; परंतु काही ग्रामस्थांनी रोपे नेली नाहीत.
- मच्छींद्र पाटील, ग्रामसेवक, पाभरे

ग्रामपंचायत येथील वृक्षलागवडसंदर्भात ग्रामसेवकाकडून माहिती घेऊन चौकशी करू
- वाय. एम. प्रभे, गटविकास अधिकारी,
पंचायत समिती म्हसळा

Web Title: The gram panchayat of the tree planted the fajja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.