ग्रामपंचायती होणार आॅनलाइन
By admin | Published: August 21, 2015 02:20 AM2015-08-21T02:20:43+5:302015-08-21T02:20:43+5:30
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून आॅप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे
खालापूर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून आॅप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉड बॅन्ड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार आधुनिक होणार असून कारभारात अधिक पारदर्शकता येणार आहे. खालापूर तालुक्यात ग्रामपंचायतींना कनेक्शन देण्यासाठीचे काम सुरू करण्यात आले असून यासाठी लागणारी केबल टाकताना स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांनी केले आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाइन करून ग्रामपंचायती थेट पंचायत समिती, जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाशी जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कामात पारदर्शकता येणार असून ग्रामस्थांना रेकॉर्ड पाहता येणार आहे. विविध प्रकारचे दाखलेही ग्रामस्थांना वेळेत मिळतील. त्या दृष्टीने सध्या ग्रामपंचायतींना इंटरनेटचे कनेक्शन देण्याची तयारी सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील जनतेला सार्वजनिक सेवा ग्रामपंचायतीद्वारे आॅप्टीकल फायबरच्या माध्यमातून ब्रॉड बॅन्डद्वारे पुरवण्यात येणार आहे. खालापूर तालुक्यात त्यासाठी केबल टाकण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. ही केबल टाकताना स्थानिकांच्या जमिनीचा वापर करावा लागणार असल्याने स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशा प्रकारे ग्रामपंचायती आॅनलाइन झाल्यानंतर ग्रामसेवक व कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताणही कमी होईल, शिवाय आॅनलाइन पद्धतीमुळे गैरव्यवहारांनाही पायबंद घालता येणार आहे. (वार्ताहर)