शासनाने निधी दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 01:20 AM2020-12-07T01:20:58+5:302020-12-07T01:22:21+5:30
Gram Panchayat News : ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत एकत्र आलेल्या गटांना शासन कोट्यवधींचा निधी कर्जस्वरूपात देत असतो. असाच निधी ग्रामपंचायतींना शासनाने दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर बनतील
पनवेल : ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत एकत्र आलेल्या गटांना शासन कोट्यवधींचा निधी कर्जस्वरूपात देत असतो. असाच निधी ग्रामपंचायतींना शासनाने दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर बनतील, अशी आशा पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी शनिवारी पनवेल येथे व्यक्त केली.
पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भास्करराव पेरे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत होते. भास्करराव पेरे पाटील हे सलग २५ वर्षे औरंगाबाद येथील पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. पाटोदा ग्रामपंचायतीला दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. राज्य शासनाने पाटोदा ग्रामपंचायतीला आदर्श गाव पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिवकर ग्रामपंचायतही रायगड जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या ३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल सरपंच अनिल ढवळे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एन. तेटगुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बाळाराम पाटील, सरपंच अनिल ढवळे, काशिनाथ पाटील, उपसरपंच लक्ष्मण तुपे, महेंद्र पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, सरपंचाने ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छ पाणी, स्वच्छता, मुलांचे शिक्षण, सांडपाण्याचा योग्य निचरा आदी प्रश्न प्रकर्षाने सोडविण्याची गरज आहे.
संकट ओढावले
कोरोना काळात राज्य शासनावर आर्थिक संकट ओढावले. यावेळी शासनाने ग्रामपंचायतीच्या खात्यातून पैसे काढल्याचा गौप्यस्फोट भास्करराव पेरे पाटील यांनी या कार्यक्रमात केला.