अवजड वाहतूकीमुळे धोकादायक बनलेल्या धुतूम अंडर पासच्या दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची ग्रामपंचायतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 04:39 PM2023-12-12T16:39:32+5:302023-12-12T16:40:12+5:30
धुतूम ग्रामपंचायतीने चिंता व्यक्त करुन दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
मधुकर ठाकूर,उरण :पळस्पा- जेएनपीए एनएच-४ बी दरम्यान धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेला सर्व्हिसरोडच्या अंडर पास रस्त्यावरुन दिवसरात्र धावणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता रहदारीसाठी अत्यंत धोकादायक ठरू लागला आहे.या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याने धुतूम ग्रामपंचायतीने चिंता व्यक्त करुन दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पळस्पा- जेएनपीए एनएच-४ बी दरम्यान नागरिकांच्या दळणवळणाची व्यवस्था म्हणून चार वर्षांपूर्वी अंडरपास आणि सर्व्हिस रोड तयार केला आहे. धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेला सर्व्हिसरोड आणि अंडरपास रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे.अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे दुचाकी, चारचाकी आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्याशिवाय या अंडरपास आणि सर्व्हिस रोडवरुन
दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू लागला आहे.अंडरपास अपघातांनाही निमंत्रण देणारा ठरत असल्याने अपघाताची संख्या वाढतच चालली आहे.
या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.त्यामुळे अंडरपास आणि सर्व्हिस रोड धुतुम रहिवाशांसाठी धोकादायक ठरू लागले आहे.याबाबत उपाययोजना करण्यासाठी धुतुम ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अंडरपास रस्त्याच्या दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची मागणी केली असल्याची माहिती धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांनी दिली.
मात्र अपघाताचे प्रवण क्षेत्र ( ब्लॅक स्पॉट) नसल्याने हाईटगेट बसविणे तुर्तास तरी शक्य नाही.मात्र याबाबत निश्चितपणे उपाययोजना केली जाईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपाध्यक्ष यशवंत घोटकर यांनी दिली.